प्रियकरासाठीच दिला मुलीचा बळी; दोघांना अटक
डिचोली : वन म्हावळिंगे येथे अडीच वर्षाच्या मुलीची हत्या तिच्या आईनेच आपल्या प्रियकरासाठी केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. डिचोली पोलिसांनी वेगवेगळ्या माध्यमातून पुरावे गोळे करताना फॉरेन्सिक विभागाचेही सहकार्य घेत असताना तपासाला गती दिली. कसून चौकशी केली असता आईनेच गळा घोटून मुलीचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
निथीन कुमारा रमेश पुजार (उत्तर कन्नड कर्नाटक) व नागम्मा रवी व्ही (वय २८, चिक्कमंगळूर कर्नाटक) या दोघांनाही पोलिसांनी अटक करून गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही. यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकेश हडपडकर व त्यांचे पथक अधिक तपास करीत आहे.
मूळ कर्नाटक येथील पण काही दिवसांपूर्वीच डिचोली तालुक्यातील म्हावळिंगे येथे आपल्या पतीला सोडून २.७ वर्षीय चिमुरडी व प्रियकरासह महिला राहत होती. तिचा प्रियकर हा जवळील चिरेखाणीवर कामाला होता. तिने चिमुरडीचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. बेशुद्धावस्थेत सदर मुलीला डिचोली येथील सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात आणल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. डिचोली पोलिसांनी सध्या महिलेसह प्रियकरालाही ताब्यात घेतले आहे.
दि. १५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सदर महिला व तिचा प्रियकर डिचोली येथून मुलीला घेऊन म्हावळिंगे येथे पोहोचले. म्हावळिंगे सीमेवरील गेटजवळ पोहोचण्यापूर्वी त्यांनी जवळील एका दुकानावर मुलीसाठी पाणी घेतले. पाणी पाजण्यासाठी मुलीला खाली झोपविले असता मुलीची काहीच हालचाल दिसत नव्हती. त्यामुळे म्हावळिंगे येथील स्थानिकांना संशय आला. मुलगी बेशुद्धावस्थेत असल्याने त्यांनी थेट १०८ रूग्णवाहिकेला संपर्क केला. सदर रूग्णवाहिकेतून मुलीला डिचोली येथील सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथे तपासले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
यावेळी मुलीची आई व प्रियकरही सोबत होता. मुलीला मृत घोषित करताच सदर माहिती डिचोली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह बांबोळी येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला तर, आई व प्रियकराला संशयित म्हणून ताब्यात घेतले होते.
१६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी डिचोली पोलीस उपअधीक्षक श्रीदेवी, पोलीस निरीक्षक विद्देश शिरोडकर व पोलीस पथकाने म्हावळिंगे येथे घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती.
दोघेही करायचे मुलीला मारहाण
शुक्रवारी पोलिसांनी तपासाला गती देताना शेजाऱ्यांकडे विचारपूस केली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नागम्मा आणि नितीन कुमार हे दोघेही सदर अडीच वर्षाच्या मुलीला मारहाण करीत होते.
गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट
बांबोळी येथे मुलीची शवचिकित्सा केल्यानंतर तिचा मृत्यू गुदमरून झाल्याचे समोर आले. या प्रकरणात घातपात असल्याचे सिद्ध झाले होते. मुलीच्या अंगावर काठीने माराचे व्रण निदर्शनास आले. प्रियकर हा चिमुरडीला बेदम मारहाण करीत असल्याचे स्पष्ट झाले.