उच्च न्यायालयाचे आदेश : अवमान याचिका निकालात, होड्यांच्या जप्तीचे निर्देश
पणजी : राज्यात होणाऱ्या बेकायदेशीर रेती उत्खनन संदर्भात गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. रात्री ८ ते सकाळी ८ दरम्यान पोलीस गस्त घालावी. याशिवाय नोंदणीकृत नसलेल्या होड्या आढळल्यास जप्त करून कारवाई करा. तसेच बेकायदेशीर रेती उत्खनन थांबवण्यासाठी सर्व आवश्यक उपाय करण्याचे निर्देश न्यायालयाने देत अवमान याचिका निकालात काढली.
याबाबतचा निकाल न्या. भारती डांगरे आणि न्या. आशिष चव्हाण यांच्या द्विसदस्यीय न्यायपीठाने दिला. याप्रकरणी ‘रेन्बो वॉरियर्स’ या संघटनेने मे २०१८ मध्ये उच्च न्यायालयात अवैध रेती उत्खननाविषयी मूळ जनहित याचिका दाखल केली होती. खंडपीठाने ती १८ डिसेंबर २०१९ रोजी निकालात काढली होती. त्यावेळी राज्य सरकार, खाण, वाहतूक, पोलीस, कॅप्टन आॅफ पोर्टचे कप्तान, तसेच संबंधित खात्यांना बेकायदेशीर रेती व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईबाबत खंडपीठाने विविध निर्देश जारी केले होते. निर्देश जारी करूनही बेकायदेशीर रेती व्यवसायावर काहीच परिणाम होत नसल्याचे दिसून आल्यानंतर गोवा रिव्हर सँड प्रोटेक्टर्स नेटवर्क यांनी २०२१ मध्ये अवमान याचिका दाखल केली. त्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये याचिका निकालात काढण्यात आली. पोलीस खात्याला न्यायालयाने अनेक आदेश दिले. याच दरम्यान पुन्हा काहीच होत नसल्यामुळे याचिकादारांनी २०२५ पुन्हा अवमान याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान रात्रीच्यावेळी अनेक ठिकाणी अजून रेती उत्खनन होत असल्याचा दावा याचिकादारांनी केला. याची दखल घेऊन सरकार तसेच याचिकादाराने रेती उत्खनन थांबवण्यासाठी उपाय योजना सुचवली तसेच सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती न्यायालयात सादर केली. याची दखल घेऊन न्यायालयाने सर्व आवश्यक उपाय करण्याचे निर्देश देत अवमान याचिका निकालात काढली.
उच्च न्यायालयाने जारी केलेले निर्देश
- रेती उत्खनन होत असलेल्या ठिकाणी रात्री ८ ते सकाळी ८ दरम्यान पोलिसांनी कडक गस्त घालावी.
- नोंदणीकृत नसलेल्या होड्या आढळल्यास जप्त कराव्यात तसेच कारवाई करून नष्ट कराव्यात.
- उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक कारवाई करणार.
- पोलीस खात्याने जारी केलेल्या आदेशाची कडक अंमलबजावणी करावी.
- तक्रार करण्यासाठी उत्तर आणि दक्षिण गोव्यात हेल्पलाईन क्रमांक जारी केले.
- राज्यातील चार मार्गावर पहाटे ३ ते सकाळी १० दरम्यान देखरेख करून रेती वाहतूक आढळल्यास कारवाई करावी.
- विनापरवाना रेती वाहतूक केल्याचे आढळल्यास संबंधित वाहनाचा परवाना रद्द करावा.