हणजूण, आसगाव कोमुनिदाद जमीन हडपप्रकरणी कारवाई
पणजी : बार्देश तालुक्यातील हणजूण आणि आसगाव कोमुनिदाद जमीन हडप प्रकरणात ईडीने गोव्यासह, नवी दिल्ली, चंडीगढ मिळून सहा ठिकाणी छापे टाकले. या संदर्भात ईडीने ‘थिंकींग आॅफ यू’ चे भागीदार उमर जाहूर शाह आणि नीरज शर्मा यांच्यासह पर्पल मार्टिन एंटरटेनमेंट प्रा. लि. चे राजेश कुमार यांच्यावर कारवाई केली. यात दीड लाख अमेरिकन डाॅलर्सची (१.२५ कोटी रुपये) क्रिप्टो करन्सी गोठविण्यात आली. तसेच विविध जमिनींच्या भूखंडमध्ये रोख रकमेची गुंतवणूक दर्शविणारे दस्तावेज आणि डिजिटल रेकॉर्ड देखील जप्त करण्यात आले.
हणजूण कोमुनिदादची लाखो चौ.मी. जमीन बनावट दस्तावेजाद्वारे हडप केल्याची तक्रार कोमुनिदादच्या अॅटर्नी सॅबेस्तीयन डिसोझा यांनी म्हापसा पोलिसांत दिली होती. सर्व्हे क्र. ४९६/१ व ४९६/१-ए मधील २ लाख चौ.मी. जमिनीच्या १९५२ मधील हंगामी ताबा प्रमाणपत्र, सीमांकन कार्यवाही पत्र, आदेश पत्र आणि १९५८ च्या अंतिम ताबा प्रमाणपत्र बनावट करून त्यावर कोमुनिदादच्या अधिकार्यांची बनावट स्वाक्षरी आणि हस्तलिखिताची नक्कल केली. ही जमीन संशयितांनी आपल्या मालकीची असल्याचे भासवून सरकारी कार्यालयात नोंदवून हडप केली होती. पोलीस निरीक्षक निखील पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर यांनी संशयित यशवंत सावंत व इतरांविरोधात गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा संशय आल्याने ईडीने चौकशी सुरू केली. त्यात तथ्य आढळल्यानंतर ईडीचे अतिरिक्त संचालक अवनीश तिवारी आणि उपसंचालक डाॅ. भागीरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ९ सप्टेंबर रोजी हणजूण, आसगाव, हैदराबाद येथे मिळून १३ ठिकाणी छापे टाकले. ईडीने यशवंत सावंत याच्यासह स्थानिक पंच आणि एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर आणि कार्यालयावर कारवाई केली. यात हणजूण कोमुनिदादच्या १२०० कोटी रुपये किमतीच्या ३.५ लाख चौ.मी. जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला. तसेच ईडीने यशवंत सावंत व इतरांकडून ७२ लाखांची रोख रक्कम, बीएमडब्ल्यू, पोर्शे केमन, आॅडी, रेंज रोव्हर अशा सात आलिशान गाड्या आणि महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले आहेत.
ईडीने १० ऑक्टोबर रोजी थिंकींग आॅफ यू चे भागीदार उमर जाहूर शाह आणि नीरज शर्मा यांच्यासह पर्पल मार्टिन एंटरटेनमेंट प्रा. लि. चे राजेश कुमार यांच्या गोव्यासह नवी दिल्ली, चंडीगढ मिळून सहा ठिकाणी छापे टाकले. त्यात दीड लाख अमेरिकन डाॅलर्सची क्रिप्टो करन्सी गोठविली. तसेच विविध जमिनींच्या भूखंडमध्ये रोख रकमेची गुंतवणूक दर्शविणारे दस्तावेज आणि डिजिटल रेकॉर्ड देखील जप्त केले.
मुख्य सूत्रधार न्यायालयीन कोठडीत
ईडीने १ ऑक्टोबर रोजी या प्रकरणात मुख्य सूत्रधार शिवशंकर मयेकर याला अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्याला प्रथम ईडीची कोठडी ठोठावली. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे.