कमी अपघात पहाटे ३ ते ६ वेळेत : राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून माहिती
पणजी : राज्यात २०२२ आणि २०२३ या दोन वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक रस्ते अपघात हे संध्याकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान झाले आहेत. २०२२ मध्ये एकूण ३,०१२ रस्ते अपघातांची नोंद झाली होती. यातील ६१९ (२० टक्के) अपघात संध्याकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान झाले होते. २०२३ मध्ये एकूण २,८४७ अपघातांपैकी ५४२ (१९ टक्के) अपघात वरील वेळेत झाले होते.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) ‘भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या’ अहवालातून ही माहिती मिळाली आहे. अहवालानुसार, २०२२ मधील एकूण रस्ते अपघातांपैकी ४७१ (१५.६३ टक्के) हे दुपारी १२ ते ३ दरम्यान झाले होते. दुपारी ३ ते संध्याकाळी ६ दरम्यान ४५७ (१५.१७ टक्के), सकाळी ९ ते दुपारी १२ दरम्यान (१३.०४ टक्के), मध्यरात्री १२ ते पहाटे ३ दरम्यान २८६ (९.४९ तक्के), सकाळी ६ ते ९ दरम्यान २६० (८.६३ टक्के) अपघातांची नोंद झाली होती. सर्वात कमी १५२ रस्ते अपघात (५.०४ टक्के) हे पहाटे ३ ते ६ दरम्यान झाले होते. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये रस्ते अपघातांची संख्या कमी झाली होती.
राज्यात २०२३ मधील एकूण रस्ते अपघातांपैकी ४८२ (१७ टक्के) हे दुपारी ३ ते संध्याकाळी ६ दरम्यान झाले होते. दुपारी १२ ते ३ दरम्यान ४२८ (१५ टक्के), सकाळी ९ ते दुपारी १२ दरम्यान ४२६ (१४.९६ टक्के), रात्री ९ ते मध्यरात्री १३ दरम्यान ३४९ (१२.२५ टक्के), सकाळी ६ ते ९ दरम्यान २५५ (८.६३ टक्के), मध्यरात्री १२ ते पहाटे ३ दरम्यान २१३ (७.४८ तक्के) अपघातांची नोंद झाली होती. सर्वात कमी १५२ रस्ते अपघात (५.३३ टक्के) हे पहाटे ३ ते ६ दरम्यान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
एका वर्षात मृत्युंमध्ये ५.४ टक्क्यांनी वाढ
राज्यात एका वर्षात रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांच्या संख्येत ५.४ टक्क्यांनी वाढ झाली. २०२२ मध्ये रस्ते अपघातात २७७ जणांचा मृत्यू झाला होता. २०२३ मध्ये ही संख्या वाढून २९२ झाली. दोन्ही वर्षात मिळून सर्वाधिक ३८७ मृत्यू दुचाकी चालकांचे झाले होते. तर ९८ पादचारी मृत्युमुखी पडले होते.