आखाडा-सांतईस्तेव येथे डिझेल चोरीप्रकरणी पाच जणांना अटक

८०० लिटर डिझेल, एक होडी, एक बोलेरो गाडी जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 hours ago
आखाडा-सांतईस्तेव येथे डिझेल चोरीप्रकरणी पाच जणांना अटक

पणजी : येथील किनारी पोलिसांनी आखाडा-सांतईस्तेव येथे छापा टाकून डिझेल चोरी प्रकरणी सांतईस्तेव येथील अजय सावंत व गोपाल नाईक, सिदान गौडा (जुवारीनगर), हकीम खान (वास्को) आणि गुड्डू राजभार (उत्तर प्रदेश) या पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून १० लाख रुपये किमतीचे ८०० लिटर डिझेल, एक होडी आणि एक बोलेरो गाडी जप्त केली.

पणजी किनारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अधीक्षक राजू राऊत देसाई आणि उपअधीक्षक राॅय परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अजित उमर्ये यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक रजनीकांत फडते, साहाय्यक उपनिरीक्षक कार्लुस पोन्टेस, हवालदार सूर्यकांत बोर्डेकर, लिलाधर गावडे, रजनीकांत गावडे, कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत कवठणकर आणि साहाय्यक उपनिरीक्षक (चालक) मिलिंद सावंत हे पथक १३ ऑक्टोबर रोजी रात्री मांडवी नदीत गस्त घालत होते. याच दरम्यान आखाडा - सांतईस्तेव परिसरात डिझेल चोरी होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार, पथकाने वरील ठिकाणी गस्त घातला. त्यावेळी तिथे नदीच्या किनाऱ्यावर एक होडी आणि गाडी थांबल्याचे पथकाच्या नजरेस आले. त्यांची चौकशी केली असता, डिझेलची चोरी होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पथकाने सांतईस्तेव येथील अजय सावंत व गोपाल नाईक, सिदान गौडा (जुवारीनगर), हकीम खान (वास्को) आणि गुड्डू राजभार (उत्तर प्रदेश) या पाच जणांना ताब्यात घेतले. तसेच १० लाख रुपये किमतीचे ८०० लिटर डिझेल, एक होडी आणि एक बोलेरो गाडी जप्त केली. त्यानंतर पणजी किनारी पोलिसांनी गुन्हा दाखल करून डिझेल चोरी प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.