गोवा : ‘माझे घर’ योजनेला प्रचंड प्रतिसाद

दोन दिवसांत १० मतदारसंघांत नागरिकांना अर्जांचे वाटप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
गोवा : ‘माझे घर’ योजनेला प्रचंड प्रतिसाद

पणजी : ‘माझे घर’ योजनेच्या अर्जांना सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत आहे. लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिल्यास ही योजना आवश्यक होती, असे दिसून येते, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी म्हटले आहे. दोन दिवसांत अर्ज वाटपाचे कार्यक्रम १० मतदारसंघांमध्ये पार पडले. सत्ताधारी आमदारांसह विरोधी आमदारांच्या मतदारसंघातही या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

या सर्व कार्यक्रमांना संबंधित मतदारसंघांचे आमदार उपस्थित होते. सोमवारी हळदोणे मतदारसंघात अर्ज वाटपाच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा हे देखील उपस्थित होते. सर्व कार्यक्रमांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह त्या-त्या भागातील आमदार आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती असते.

सरकारी, कोमुनिदाद आणि खासगी जमिनीवरील अनधिकृत घरे अधिकृत करण्यासाठी गोवा सरकारने ‘माझे घर’ योजना सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ४ ऑक्टोबर रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

मये मतदारसंघात अर्ज वाटपाच्या शुभारंभाचा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मयेचे आमदार प्रेमेंद शेट, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष धाकू मडकईकर, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर आणि उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव उपस्थित होते. मामलेदार, जिल्हाधिकारी तसेच इतर सरकारी अधिकारी देखील या कार्यक्रमांना हजर असतात.
‘माझे घर’ योजनेचे अर्ज भरून सादर करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

कोमुनिदादींनी पाठिंबा द्यावा : मुख्यमंत्री
घरे अधिकृत करण्याच्या या योजनेला काही कोमुनिदादींनी विरोध केला आहे. मात्र, कितीही कायदेशीर लढे झाले तरी सरकारला फरक पडणार नाही. लोकांनी कोमुनिदादींच्या सदस्यांना पैसे देऊन घरे बांधली आहेत. लोक जो दंड भरतील, तो देखील कोमुनिदादींनाच मिळेल. त्यामुळे कोमुनिदादींनी या योजनेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सर्व कार्यक्रमांमध्ये करत आहेत.

अर्ज वाटप झालेले मतदारसंघ :
- पहिला दिवस (सोमवार) : मये, डिचोली, थिवी, नास्नोळा आणि म्हापसा.
- दुसरा दिवस : दक्षिण गोव्यातील मुरगाव, वास्को, दाबोळी, सांगे आणि कुडचडे.

हेही वाचा