पणजीः गोव्यात प्रथमच समान परीक्षा झाल्या ज्यासाठी सर्व शाळांना एससीईआरटीने तयार केलेल्या प्रश्नपत्रिका दिल्या गेल्या. एससीईआरटीने तब्बल ११८ प्रश्नपत्रिका या साठी तयार करून हे आव्हान पेलले.
‘अखेर सर्व इयत्तांसाठी आणि सर्व माध्यमांसाठी एकूण 118 प्रश्नपत्रिका तयार करण्याचे मोठे काम पूर्ण केले आहे. या प्रश्नपत्रिका सर्व शाळांपर्यंत वेळेत पोहोचविणे, उड्डाण पथकांद्वारे देखरेख करणे या सर्व प्रक्रिया अनेक अडचणी असूनही यशस्वीरीत्या पार पाडल्या. अनेक अडचणी असूनही हे काम पूर्ण झाले’, अशी प्रतिक्रिया एससीईआरटीच्या संचालक मेघना शेटगांवकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, गोव्यात प्रथमच हा प्रयोग करण्यात आला. यामुळे अध्यापन आणि मूल्यमापन प्रक्रियेत एकरूपता व प्रमाणबद्धता येण्यास मदत होईल. एकूण १४०० शाळांचा या उपक्रमात समावेश आहे असे शेटगांवकर म्हणाल्या.
एकाच प्रश्नपत्रिकेत चूक
राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कार्यवाही सुरू झाल्यानंतर गोव्यात ३ री ते ८ वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना समान सामायिक परीक्षा झाली. प्रश्नपत्रिका गोवा राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाने (जीएससीईआरटी) तयार केल्या. सर्व विद्यार्थ्यांसाठी एकाच वेळी परीक्षा घेण्यासाठी हा अभिनव उपक्रम यशस्वी झाला ७ रोजी सुरू झालेल्या परीक्षांचे सत्र १५ ऑक्टोबरला संपणार आहे.
दरम्यान, ६ वीची एक प्रश्नपत्रिका चुकीच्या पर्यायांमुळे सध्या व्हायरल होत आहे. संबंधित प्रश्नपत्रिका ही एकाच शाळेला पाठवल्याचे एससीईआरटीने स्पष्ट केले. इतर सर्व शाळांसाठी पाठवलेल्या प्रश्नपत्रिकेत चूक नव्हती. एका शाळेला परीक्षा वेळापत्रकानुसार घेता आली नाही त्यामुळे त्यांना पाठवलेल्या एकाच प्रश्नपत्रिकेत ती चूक राहिली असे एससीईआरटीच्या सूत्रांनी सांगितले.