बेफिकीर, बेधुंद पर्यटकांमुळे गोव्याच्या पर्यटनाला गालबोट

पर्यटकांची स्थानिकांना डोकेदुखी : पर्यटकांमुळे अपघात, मारामाऱ्या वाढल्या

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
बेफिकीर, बेधुंद पर्यटकांमुळे गोव्याच्या पर्यटनाला गालबोट

पणजी : हिरवागार निसर्ग, फेसाळत्या लाटा, रुपेरी वाळू, मनमोहक सूर्योदय, सूर्यास्त अशी देण लाभलेला गोवा देशी-विदेशी पर्यटकांसाठी नंदनवन आहे. पर्यटक बनून येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी ही गोवा जगभर प्रसिद्ध आहे. 'अतिथी देवो भव' म्हणून या पाहुण्यांच्या स्वागतासाठी गोमंतकीय तत्पर असतात. मात्र, पाहुणे पर्यटकच जेव्हा आपला शिष्टाचार, शिस्त विसरतात तेव्हा सांगायचे कुणाला हा प्रश्न सध्या समोर येऊ लागला आहे. पर्यटक बनून आलेले बेफिकीर वाहनचालक, मद्याच्या धुंदीत कायदा हातात घेणारे, मारामाऱ्या करणाऱ्या पर्यटकांमुळे सध्या गोव्याच्या पर्यटनाला गालबोट लागत आहे.

राज्यातील पर्यटन हंगाम सुरू होत असतानाच एक चिंताजनक पॅटर्न समोर येत आहे. पाहुणचाराच्या भावना काही पर्यटकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे कसोटीला लागत आहे. काही पर्यटक स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत मनमानेल तसे वागत आहेत.

खालील घटना बोलक्या 

मागच्या आठवड्यात बुधवारी आसगाव येथे एका पर्यटकाने सूव गाडीने शिवोली येथील ४५ वर्षीय स्थानिक व्यक्तीला धडक देऊन जवळपास १५ मीटरपर्यंत नेले. सदर व्यक्ती सध्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसीयूमध्ये जीवनाशी झुंज देत आहे. याच्या दुसऱ्याच दिवशी कळंगुट येथे एका बीएमडबल्यू गाडीने स्थानिक लोकांना धडक दिली; त्यात एक लहान मुल ही होते. गाडी चालवत असलेला पर्यटक अपघातानंतर घटनास्थळावर न थांबताच पळून गेला. यामुळे स्थानिक संतप्त झाले व पोलीस स्थानकात जमून कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी संबंधित पर्यटकांना अटक केली असली तरी अशी प्रकरणे वारंवार घडत आहेत.

किनारी भागात पर्यटकांचा उपद्रव 

कांदोळी येथे काही पर्यटकांनी मद्यधुंद अवस्थेत पार्क केलेल्या दुचाकी वाहनांची तोडफोड केली. काचा फोडल्या, चाके वाकवली व रस्त्यावर धुमाकूळ घातला.

साळगाव रस्त्यावर उशीरा रात्री दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या कर्नाटकमधील पाच पर्यटकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या गाडीमध्ये रिकाम्या बिअरच्या बाटल्या आढळून आल्या. अनेक पर्यटक रस्त्यांवर आणि समुद्रकिनाऱ्यांवर कारच्या बोनेटवर बसून, गाड्यांच्या खिडक्यांच्या बाहेर डोकावून किंवा गाडी थेट वाळूत घालून बेफाम गाडी चालवतात.पोलीस अशा प्रकरणांवर कारवाई करीत असले तरी अजून कायद्याची भीती व शिस्त निर्माण झालेली दिसत नाही.

खालील  प्रतिक्रिया बोलक्या

ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे (TTAG) अध्यक्ष जॅक सुखिजा यांनी सांगितले की, अशा त्रासदायक वागणुकीला आळा घालण्यासाठी कठोर पोलीस कारवाई आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणी गरजेची आहे.

'गोव्याची पर्यटन संस्कृती नेहमीच परस्पर सन्मानावर आधारित आहे ती म्हणजे पाहुणा आणि यजमान यांच्यातील आदर. पण काही पर्यटक गोव्याच्या सीमेत येताच पाऊल टाकताच कायदा व शिस्त विसरतात. ही मानसिकता धोकादायक आहे. ती स्थानिकांचा अवमान करते व जबाबदार पर्यटनाच्या संकल्पनेलाही धक्का देते, असे सुखिजा म्हणाले.गोव्यात कायद्याची कडक अंमलबजावणी होते, हे पर्यटकांना समजल्यास अशा प्रकारचे वर्तन आपोआप कमी होणार असल्याचे ते पुढे म्हणाले.

स्थानिक व्यावसायिकांना चिंता 

हॉटेल व्यावसायिक आणि लघु व मध्यम हॉटेल्सचे माजी अध्यक्ष सेराफिन कॉत्ता यांनी सांगितले की, स्थानिक समुदायाचा पाठिंबा हा गोव्याच्या पर्यटन अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आणि अशा घटना त्या विश्वासाला तडा देत आहेत.

पाहुणचार म्हणजे असाहयता नव्हे. आम्ही पाहुण्यांचे स्वागत प्रेमाने करतो, पण त्यांनी आमच्या रस्त्यांचा, लोकांचा आणि जीवनशैलीचा सन्मान केला पाहिजे. काही बेशिस्त पर्यटक गोव्याची शांती व सुरक्षित प्रतिमा धोक्यात आणत असल्याचे कॉत्ता म्हणाले.

पर्यटनाशी संबंधित समस्यांवर काम करणारी कोणतीही यंत्रणा नाही.

पर्यटन खाते एकटे काही करू शकत नाही. सर्व संबंधित घटकांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायला हवेत, तरच दीर्घकालीन उपाय शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

पोलिसांची किनारी भागात गस्त

पोलीस अधिकारी सांगतात की, हे प्रकार गांभीर्याने घेतले जात आहेत. उत्तर गोव्याचे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी मान्य करतात की अशा घटना वारंवार घडत आहेत. पण पोलीस कडक कारवाई करीत आहेत. 'आम्ही विशेषतः किनारी भागांमध्ये रात्रीची गस्त वाढवली आहे. जो कोणी कायदा मोडणार किंवा इतरांच्या जीविताला धोका निर्माण करणार, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार.

वास्तविक, गोव्यातील मोकळेपणा पर्यटकांना आकर्षित करतो. पण हा मोकळेपणा पुर्वीसारखा राहिलेला नाही.  पाहुणा असो किंवा यजमान 'आदर' हा दोघांनीही पाळायचा असतो. आणि चांगले पर्यटन नेहमीच परस्पर सन्मानावर उभे असते.

हेही वाचा