हरमल किनारी भागात पोलिसांचे ‘कॉम्बिग ऑपरेशन’, २० जण ताब्यात

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
हरमल किनारी भागात पोलिसांचे ‘कॉम्बिग ऑपरेशन’, २० जण ताब्यात

हरमल : किनारी भागात अवैध व बेकायदेशीर वास्तव्य करून असलेल्या पर्यटक व नेपाळी व अन्य कामगारांची तपासणी करण्यात आली. २० जणांना ताब्यात घेण्यात आले.

या ऑपरेशन मध्ये पोलिसांच्या तीन तुकड्या सहभागी झाल्या होत्या. त्यांनी पूर्ण हलमल किनारा, हॉटेल्स ते स्वीट लेक पर्यंतच्या भागात ऑपरेशन केले. पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.  पेडणेचे पोलीस उपअधीक्षक सलीम शेख, मांद्रे पोलीस स्थानकाचे निरीक्षक गिरेंद्र नाईक व पोलीस कुमक सोबत होती. अनेक रेस्टॉरंट मध्ये कामगारांचे ‘सी फार्म’ न भरल्याच्या कारणास्तव पोलिसांनी ताब्यात घेतले. या किनारी भागात पोलीस उपनिरीक्षकाच्या नेतृत्वाखाली तीन गट केले व विविध भागात जाऊन कसून तपासणी केली.

गणेशपुरी, म्हापसा येथे डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा टाकून दरोडा टाकणारे बांगलादेशात पळून गेले. इतर अनेक घरफोड्या, चोरीची प्रकरणे घडली. त्याला अनुसरून काॅम्बिग ऑपरेशन सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. विदेशी पर्यटकांचे पासपोर्ट व इतर कागदपत्रे पडताळून पाहण्यात आली. ही कारवाई चालूच राहणार असून, या भागातील व्यावसायिक, नागरिकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिला.

दरम्यान, व्यावसायिक व नागरिकांनी या ऑपरेशनचे स्वागत केले आहे. परप्रांतीयांवर देखरेख ठेवण्यासाठी ही मोहीम आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी सुरू असलेला नायजेरियन युवतींचा वेश्याव्यवसाय पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पोलिसांनी धरपकड मोहीम हाती घ्यावी व संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक युवकांनी केली आहे. 

हेही वाचा