दहावी परीक्षेचे अर्ज २२ ऑक्टोबरपासून पोर्टलवर स्वीकारणार
पणजी : शालान्त मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या (SSC) परीक्षेसाठीचे अर्ज पोर्टलवर २२ ऑक्टोबरपासून स्वीकारण्यात येतील. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या बारावीच्या (HSSC) परीक्षेचे अर्ज पोर्टलव्दारे आजपासून (१४ ऑक्टोबर) स्वीकारण्यास सुरवात झाली. दहावी, बारावी परीक्षेसाठी १२०० रूपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे. परीक्षेचा अर्ज मुदतीत सादर न केल्यास ५०० रूपयांचे अतिरिक्त शुल्क (लेट फी) भरावे लागणार आहे.
शालान्त मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ वर्षासाठीची दहावीची परीक्षा २ मार्च, २०२६ पासून सुरू होणार आहे. बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होईल.
परीक्षेचे शुल्क तसेच परीक्षेचे अर्ज भरण्याच्या तारखा शालान्त मंडळाने जाहीर केल्या आहेत.
बारावी परीक्षेसाठी (ऑनलाईन) पोर्टलवर १४ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर, २०२५ पर्यंत अर्ज सादर करावा लागेल. परीक्षेचे शुल्क १२०० रूपये असेल. याशिवाय गुणपत्रिका, पास झाल्याच्या प्रमाणपत्रासाठी ३५० रूपये तर प्रात्यक्षिक परीक्षेसाठी (प्रती विषय) १७५ रूपयांचे शुल्क असेल. १० नोव्हेंबरनंतर अतिरिक्त शुल्क (लेट फी) ५०० रूपये भरून २५ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत अर्ज सादर करता येतील. २५ नोव्हेंबर नंतर अर्ज भरल्यास अतिरिक्त शुल्कासह १५०० रूपयाचे शुल्क भरावे लागेल. १५०० रूपये शुल्क भरून अर्ज भरण्याची शेवटची तारीख २५ डिसेंबर २०२५ आहे.
दहावी परीक्षेसाठी २२ ऑक्टोबरपासून अर्ज स्वीकारणार
दहावी परीक्षेसाठी (ऑनलाईन) शालान्त मंडळाच्या पोर्टलवर २२ ऑक्टोबर, २०२५ पासून अर्ज स्वीकारले जातील. परीक्षेचे शुल्क १२०० रूपये आहे. १५ नोव्हेंबर २०२५ ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे. याशिवाय गुणपत्रिका, पास झाल्याच्या प्रमाणपत्रासाठी ३५० रूपये तर प्रात्यक्षिक परीक्षेसाठी (प्रती विषय) १७५ रूपयांचे शुल्क असेल. १५ नोव्हेंबर नंतर व २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ५०० रूपये अतिरिक्त शुल्कासह (लेट फी) अर्ज स्वीकारले जातील. २५ नोव्हेंबर नंतर अतिरिक्त शुल्का (लेट फी) सह १५०० रूपयांचे शुल्क आकारले जाईल. १५ डिसेंबर, २०२५ पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत असेल.