सडा येथील ‘त्या’ सदनिकांचा मालकी हक्क लवकरच मिळणार
वास्को : सर्वसामान्य गोवेकरांसाठी असलेली ‘म्हंजे घर’ या योजनेला विरोध करणाऱ्यांना जवळ करू नका असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे मंगळवारी वास्को येथे केले. सर्वसामान्यांनी गेल्या कित्येक वर्षापूर्वी बांधलेल्या घरांमध्ये त्यांना व पुढील पिढीला सुखासमाधानाने राहता यावे यासाठी हि योजना चालीस लावली आहे. सडा भागातील गोवा राज्य पुनर्वसन बोर्डाच्या वसाहतीतील सदनिकांची मालकी हक्क संबंधितांना देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
येथील रवींद्र भवनात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर, दक्षिणा गोवाच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्स, मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली, संयुक्त मामलेदार जान्वी केळेकर, गोवा राज्य पुनर्वसन बोर्डाचे सदस्य सचिव आलेक्स डिकॉस्ता, रवींद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव उपस्थित होते.
जो घर बांधतो, त्याची एकच इच्छा असते की, आपल्यानंतर आपल्या पुढील पिढीलाही या घराचा आसरा मिळाला पाहिजे. त्यांची ती ईच्छा आता पूर्ण होणार आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता आता काहीजण आता आम्हीही भाजपावाले आहोत असे सांगतील, त्यांच्यापासून सावध राहा असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. मुरगावातील बहुतांश बांधकामे सरकारी जमिनीवर असल्याने जानेवारीपर्यंत सनद देण्याचे प्रयत्न आहेत. इतर ठिकाणी सहा महिन्यांचा कालवधी ठेवण्यात आला आहे. परंतू येथे तीन महिन्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे डॉ.. सावंत म्हणाले. डॉ. सावंत यांनी सरकारी, कोमुनिदाद, खासगी जमिनींवरील बांधकामांसंबंधी उपस्थितांना माहिती दिली. एखाद्याचे घर रस्त्याकडेला असेल, तर त्या घरालाही संरक्षण मिळेल, ते सार्वजनिक बांधकाम खात्याला पाडता येणार नाही. जर गरजच असली तर नुकसान भरपाई द्यावी लागेल किंवा दुसरीकडे सोय करावी लागणार असे डॉ. सावंत यांनी सांगितले. ‘म्हंजे घर’साठी पालिकेने निर्धारीत वेळेत दाखले दिले नाही, तर थेट मला फोन करा असे आवाहन त्यांनी केले
संकल्प आमोणकर यांनी ‘म्हंजे घर’ योजना हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यामुळे ‘म्हंजे घर’ची संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. जेणेकरून लोकांना घराचा मालकी हक्क मिळणार आहे. जेणेकरून घर पाडण्यात येईल हा त्यांच्या मनातील भय दूर होणार आहे. मुरगावात बहुतांश घरे सरकारी जमिनीवर असल्याने लोकांना दिवाळीची ही भेट मिळाली आहे. या योजनेला विरोधी पक्ष विरोध करीत होते. विरोधकांच्या अफवांना बळी पडू नका. एजंटापासून सावध राहा असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी सागर नाईक, चंद्रशेखर परब, तुळशीदास खवणेकर, संध्या मसुरकर इत्यादींना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते फॉर्म देण्यात आले.