रस्त्यांच्या कामांवर नजर ठेवणार - आप

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
रस्त्यांच्या कामांवर नजर ठेवणार - आप

पणजी : आपने राज्यातील खराब रस्त्यांबाबत सुरू केलेल्या भाजपचे बुराक मोहीमेला यश येत आहे. सरकारने काही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कंत्राट काढले आहेत. यावेळी होणाऱ्या रस्त्यांच्या कामावर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते नजर ठेवणार आहेत. त्यामुळे यावेळी कंत्रादारांकडून कामामध्ये हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचे आप नेते श्रीकृष्ण परब यांनी सांगितले. मंगळवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी चेतन कामत उपस्थित होते. 

परब यांनी सांगितले की, भाजपचे बुराक मोहिमेअंतर्गत आम्ही राज्यभरातील एक लाखहून अधिक जणांच्या सह्या गोळा करून त्या सरकारला पाठवल्या आहेत. जनतेचा असा दबाव पाहूनच सरकारने रस्ते दुरुस्तीसाठी कंत्राट काढले आहेत. मागील वेळेस योग्य काम न झाल्याने आज रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वी केलेले रस्ते आज खड्डेमय झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी रस्त्याच्या कामाची वॉरंटी असल्याचे सांगितले होते. खराब झालेले रस्ते त्यांच्याकडून पुन्हा करून घेण्यात येईल असेही ते म्हणाले होते. असे असले तरी आता पुन्हा नव्याने कंत्राट काढण्याचे कारण काय हे सरकारने सांगावे. 

कंत्राटदारातर्फे करण्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन कामाची तपासणी आम आदमी पक्षातर्फे केली जाईल. कामाचा दर्जा चांगला नसेल तर कंत्राटदाराला उघडे पाडण्यात येईल. ज्या पद्धतीने आम्ही प्रत्येक मतदारसंघातून सह्या गोळ्या केल्या होत्या. त्याच पद्धतीने प्रत्येक मतदार संघात रस्त्याच्या कामांचा आढावा घेतला जाईल. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी देखील याची नोंद घ्यावी. काम झाल्यानंतर माहिती अधिकार कायद्याअंतर्गत कामाचा दर्जा आणि खर्च ही माहिती घेण्यात येणार असल्याचे परब यांनी सांगितले.

पाच वर्षांची वॉरंटी घ्यावी 

कामत यांनी सांगितले की, राज्यात दरवर्षी रस्त्यांवर खर्च केला जातो. मात्र काही काळातच हे रस्ते खराब होतात. प्रत्येक वेळी कंत्राट काढण्यापेक्षा सरकारने कंत्राटदाराकडून पाच वर्षाची वॉरंटी घ्यावी. पाच वर्षे रस्त्यांना काही होणार नाही असे त्याच्याकडून लिहून घ्यावे.


हेही वाचा