पणजी : वीज खात्याने बेकायदेशीर (illegal) इमारतींना नव्या वीज जोडण्यांवर तत्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी या विषयीचे परिपत्रक सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठवले असून, ईएचएन दिलेल्या घरांना वीज जोडण्या देऊ नयेत असे स्पष्ट केले आहे.
या परिपत्रकात म्हटले आहे की, संबंधित प्राधिकरणांची परवानगी न घेता बांधण्यात आलेल्या बांधकामांना वीजजोडणी देऊ नये. अशा बांधकामांना ‘ईएचएन’ (Enabling Housing Number) देण्यात आला असला तरी त्याचा अर्थ बांधकाम कायदेशीर आहे असा होत नाही. हा क्रमांक फक्त स्थानिक संस्थांकडून (पंचायत, पालिका) कर आकारणीसाठी वापरला जातो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाच्या ६ मार्च, २०२५ रोजीच्या आदेशानुसार, नव्या वीज जोडणीसाठी बांधकाम परवाना आणि तांत्रिक मंजुरी प्रमाणपत्र आवश्यक राहील, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
वीज खात्याच्या सर्व उपविभागीय कार्यालयांना हे निर्देश तातडीने अमलात आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत.