कॅसिनोतील सुरक्षा रक्षकाच्या खूनप्रकरणी जामीन फेटाळला

कॅसिनो कार्निव्हलमध्ये झाली होती हाणामारी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
कॅसिनोतील सुरक्षा रक्षकाच्या खूनप्रकरणी जामीन फेटाळला

पणजी : कॅसिनो कार्निव्हलचा सुरक्षा रक्षक धीरू शर्मा (३३, मध्य प्रदेश) याच्या खूनप्रकरणात संशयित अब्दुल अल्ताफ (२५, हैदराबाद) याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. संशयिताविरुद्ध प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष तसेच सीसीटीव्ही फुटेजमधील पुरावे स्पष्ट असल्याचे निरीक्षण नोंदवत मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी हा आदेश दिला.

या प्रकरणी कॅसिनो व्यवस्थापक अंबादत्त जोशी यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, २९ मे २०२५ रोजी पहाटे ३.१० वाजता ग्राहक अब्दुल अल्ताफ याने कॅसिनोत हरल्यानंतर राडा केला होता. त्याच दरम्यान त्याला सुरक्षा रक्षकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयिताने लाकडी काठीच्या साहाय्याने सुरक्षारक्षकांवर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात काठीच्या टोकाला असलेल्या लोखंडी क्लॅम्पमुळे सुरक्षा रक्षक धीरू शर्मा याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तत्काळ बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तर हल्ल्यात दुसरा सुरक्षारक्षक सत्यम सुभाष गावकर (२७, शिरोडा -गोवा) हा जखमी झाला होता. त्याला नंतर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला.

यानंतर पोलीस पथकाने दाबोळी विमानतळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला संशयित अब्दुल अल्ताफ याला अटक केली होती. त्यानंतर निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी तपास पूर्ण करून मेरशी येथील उत्तर गोवा सत्र न्यायालयात संशयित अल्ताफ याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर संशयिताने न्यायालयात जामीन अर्ज दाखल करून सुटका करण्याची मागणी केली.

या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, संशयिताच्या विरोधात सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष आहे. तसेच संशयिताविरोधात आणखीन गंभीर गुन्हे दाखल झाले अाहे. तो गोव्याबाहेरील असून त्याला जामीन मंजूर केल्यास तो फरार होणार असल्याचा युक्तिवाद सरकारी अभियोक्ता शिवराम पाटील यांनी मांडला. या प्रकरणी न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून संशयित अब्दुल अल्ताफ याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

दाबोळी विमानतळावर केली होती अटक

घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करून तत्कालीन पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दाबोळी विमानतळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला संशयित अब्दुल अल्ताफ (२५, हैदराबाद) याला अटक केली होती.