रवी नाईक : राजकारणातील अवलिया!

राजकारणी, समाजकारणी, कला, औद्योगिक क्षेत्रांतील लोकांच्या प्रतिक्रिया

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
रवी नाईक : राजकारणातील अवलिया!

तळपत्या पर्वाचा अस्त!
गोव्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते रवी नाईक यांचे निधन अकल्पित, धक्कादायक आणि अत्यंत क्लेशकारक आहे. त्यांच्या जाण्याने गोव्याने एक कुशल संघटक, थोर प्रशासक, धुरंधर राजकारणी आणि एक धाडसी नेता गमावला आहे. त्यांचे निधन म्हणजे गोमंतक भंडारी समाजावर झालेला प्रचंड आघात आहे. रवी नाईक अखेरपर्यंत तेजस्वी सूर्यासारखा तळपत राहिला. रवीचे जाणे म्हणजे एका तळपत्या पर्वाचा अस्त आहे. त्यांच्या पवित्र आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुर्धर प्रसंगातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम शांती! - श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री

बहुजन समाजाचा बुलंद आवाज हरपला !
गोमंतकीय बहुजन समाजाचा बुलंद आवाज, कूळ मुंडकारांचे तारणहार, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान कृषी मंत्री रवी नाईक यांचे आकस्मिक निधन ही राज्याची फार मोठी हानी आहे. रवी नाईक यांनी नेहमीच सत्ता हे समाजाच्या सेवेचे माध्यम मानून काम केले. समाजाच्या तळागाळातील शेवटच्या वंचित माणसाला त्यांनी वेळोवेळी मदत केली. रवी नाईक यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द अल्पकाळ असली तरी गुन्हेगारांचा कर्दनकाळ ही त्यांची जनमानसातील प्रतिमा आजही कायम आहे. स्व. रवी नाईक यांच्या आत्म्यास देव सद्गती देवो, ही भावपूर्ण श्रद्धांजली. - डॉ. रमेश तवडकर, कला आ‌णि संस्कृती मंत्री


रवीचा अस्त… पण त्याच्या कार्याचा प्रकाश अढळ !

गोव्याचे माजी मुख्यमंत्री व कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मन अत्यंत व्यथित झाले. त्यांच्या निधनाने गोवेकरांनी एक अनुभवी, प्रगल्भ आणि समाजहितासाठी समर्पित नेतृत्व गमावले. श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठाच्या स्थापनेच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून राज्याचे कुशल नेतृत्व करताना सद्गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामींपासून ते आजतागायत त्यांनी दिलेले योगदान सदैव गोमंतकीयांच्या स्मरणात राहील. तसेच राज्य सरकारच्या विविध महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजहितासाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय होते. श्री दत्त पद्मनाभ पीठाकडून भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांतिः। - ब्रह्मेशानंद स्वामी, श्री क्षेत्र तपोभूमी, कुंडई

चाणाक्ष राजकारणी गमावला !
सत्तेत असो वा नसो, परंतु शेवटपर्यंत भंडारी समाजाचा एक अनभिषिक्त सम्राट हे स्थान कायम टिकवून ठेवलेला कुणाला पटो वा न पटो, आपले म्हणणे परखडपणे, आपल्याच एका विशिष्ट ढबीने मांडणारा, जाहीर ठिकाणीही सामान्य माणसाच्या खांद्यावर हात टाकून त्याला जवळीक देणारा, परंतु राजकीय क्षेत्रात आपल्यासमोर येणारे धोके दुरूनच पारखणारा एक मिश्किल स्वभावाचा चाणाक्ष राजकारणी गेला. राजकीय क्षेत्रात त्याची जाणीव कायम राहील. स्व. रवी नाईक यांनी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही फोंड्यात फार मोठे कार्य करून ठेवलेले आहे. जनतेच्या स्मृतीत अढळपद ठेवणारा हा लोकनेता होता. स्व. रवी नाईक यांच्या आत्म्यास सद्गती लाभो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. - सुभाष वेलिंगकर

गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा बहुजन समाजाचे आधारस्तंभ आणि कृषिमंत्री रवी नाईक यांनी सर्वसामान्य तथा पददलित लोकांसाठी अतोनात केलेले प्रयत्न गोव्यातील तमाम कूळ-मुंडकार कदापि विसरू शकत नाहीत. ‘कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचे घर’ या विषयासंदर्भात सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन त्यांनी कष्टकरी, शेतकरी व गरीब समाजाला आधार दिला. अशा या बहुजनहितकारी थोर व्यक्तिमत्त्वाला गोव्यातील कूळ-मुंडकार मुकले आहेत. - दीपेश नाईक, गोवा कूळ-मुंडकार संघर्ष समितीचे अध्यक्ष

गोवा श्रमिक पत्रकार संघटनेकडून शोक व्यक्त
फोंडा आणि मडकई विधानसभा मतदारसंघांतून सात वेळा आमदार राहिलेले नाईक सामान्य परिस्थितीतून राजकारणात उच्च पदावर पोहोचले होते. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीस त्यांनी दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले. १९९८ मध्ये ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून उत्तर गोव्यातून लोकसभेचे खासदारही होते. लोकप्रतिनिधी म्हणून नाईक हे माध्यमांशी नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारे आणि सहज उपलब्ध असणारे नेते होते, अशा शब्दांत गोवा श्रमिक पत्रकार संघटनेतर्फे (गुज) श्रद्धांजली वाहण्यात आली.

गोव्याचा विकास व तळागाळातील जनतेच्या सशक्तीकरणासाठी रवी नाईक यांचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने मला अतीव दु:ख होत आहे. - नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री

रवी नाईक यांनी गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात अनेक वर्षे सेवा केली. त्यांचे हे योगदान नेहमीच आदर आणि कृतज्ञतेने लक्षात ठेवले जाईल. - अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

रवी नाईक हे गोव्याच्या सार्वजनिक जीवनातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. शासन, सामाजिक न्याय या क्षेत्रातील त्यांचे योगदान आदराने लक्षात ठेवले जाईल. त्यांनी उपेक्षित समुदायांचे उत्थान करण्याचा, गोव्याच्या ओळखीचे समर्थन करण्याचा, आवाजहीन लोकांसाठी उभे राहण्याचा प्रयत्न केला. - विजय सरदेसाई, अध्यक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री रवी नाईक यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांना मनापासून श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. - अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय संयोजक, आप.
.................
रवी नाईक यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले. ते एक समर्पित नेते होते. त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम केले. त्यांच्या दूरदृष्टीने आणि विकासात्मक उपक्रमांनी गोव्यावर अविट छाप सोडली आहे. त्यांच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना आणि मित्रांना माझ्या मनःपूर्वक संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. - युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.

रवी नाईक हे गोव्यातील बहुजनांचे आधारस्तंभ होते. त्यांच्या निधनाने गोव्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. आमच्यात काही मतभेद असले तरी मनभेद कधीही नव्हता. समाजासाठी काम केल्यावर व्यक्ती कशी पुढे जाते याचे ते उत्तम उदाहरण होते. - सुदिन ढवळीकर, वीज मंत्री

रवी नाईक यांच्या जाण्याने गोव्याचे तसेच भंडारी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. तळागाळातून वर आलेल्या रवी नाईक यांनी आपल्या कर्तृत्वाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. - अमित पालेकर, प्रदेशाध्यक्ष आप

रवी नाईक हे करारी नेते होते. त्यांनी शून्यातून आपली कारकीर्द घडवली. बहुजन समाजासाठी त्यांनी केलेले कार्य नेहमीच लक्षात ठेवले जाईल. समाज त्यांचे योगदान कधीही विसरणार नाही. - दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष, भाजप

रवी नाईक यांनी मागील अनेक वर्षे बहुजन समाजाला आधार दिला होता. त्यांनी आपल्या कार्यकाळात महिलांचे सबलीकरण केले. कुळ, मुंडकारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा दिला होता. ते माझे राजकीय गुरू होते. - गोविंद गावडे, आमदार