म्हापसा दरोडा प्रकरणी अटक केलेल्या दोघांना ९ दिवसांची पोलीस कोठडी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
म्हापसा दरोडा प्रकरणी अटक केलेल्या दोघांना ९ दिवसांची पोलीस कोठडी

म्हापसा : गणेशपुरी, म्हापसा येथे डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर घातलेल्या सशस्त्र दरोडा प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोघाही संशयितांना न्यायालयाने नऊ दिवसांची  पोलीस कोठडीत सुनावली आहे. 

याप्रकरणी संतोष बाबू बी. (27, रा. इब्बलुरू बंगळूरू) व सफिकुल रोहूल अमीर (37, रा. इब्बलुरू बंगळूरू) या दोघाही मूळ बांगलादेशी नागरिकांना म्हापसा पोलिसांनी मंगळवारी 14 रोजी रितसर अटक केली होती.  बुधवारी दुपारी या संशयितांना पोलिसांनी म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केले असता त्यांना 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

 7 ऑक्टोबरला डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर हा सशस्त्र दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी पीडित घाणेकर कुटूंबियांना धमकावून व बंदी बनवून घरातील सुमारे 35 लाखांचा ऐवज लुटून नेला होता.

दरोडा टाकलेल्या सहा जणांना बांगलादेशमध्ये सुखरूप पळून जाण्यास अटक केलेल्या संशयितांनी मदत केली होती. संशयित हे दरोडे टाकलेल्या टोळीतील काहीजणांचे नातेवाईक आहेत. गोवा पोलिसांनी याप्रकरणी तांत्रिक मानवी माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेत घटनेच्या आठवड्याभरानंतर याप्रकरणात अटक केली होती.  

 याप्रकरणी पोलिसांनी भा.न्या.सं.च्या 331(3), 115(2), 351(3), 126(2), 310(2), 61(2), 111 व 3(5) कलमांन्वये गुन्हा नोंद केलेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निख‌िल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर हे करीत आहेत.