दवर्ली सरपंच, उपसरपंच निवडणूक गोंधळानंतर लांबणीवर

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
दवर्ली सरपंच, उपसरपंच निवडणूक गोंधळानंतर लांबणीवर

मडगाव : दवर्ली दिकरपाल सरपंच व उपसरपंचपदासाठी बुधवारी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर माजी मंत्री रवी नाईक यांच्या देहांतामुळे सुटीचा आदेश आला. निवडणूक अधिक़ार्‍यांनी निवडणूक प्रक्रिया थांबवत अहवालावर पंचांच्या सह्या घेतल्या. मात्र, काहीवेळाने बीडिओंनी निवडणुका घेण्यात येतील, असे सांगितल्याने गोंधळ उडाला. पंचांनी निवडणुकीसाठी पुढील तारीख द्यावी अशी मागणी केल्यानंतर निवडणूक लांबणीवर पडली.

दवर्ली सरपंच साईश राजाध्यक्ष व उपसरंपच विद्याधर आर्लेकर यांनी राजीनामा दिल्यापासून सरपंच व उपसरपंचपद रिक्त आहे. यासाठी सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका बुधवारी पंचायतीच्या कार्यालयात ठेवण्यात आलेल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार अर्ज सादर करण्यास सांगताच पंच मिनिनो जुवाव कुलासो, फ्रान्सिस्को डायस, विद्याधर आर्लेकर व संपदा नाईक यांनी अर्ज सादर केले. अर्ज मागे घेण्याच्या कालावधीत कुणीही अर्ज मागे घेतलेला नव्हता. त्यादरम्यान बीडिओ आदर्श देसाई हे पंचायतीमध्ये आले व पंचायत संचालनालयाकडून कॉल आला होता, मंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे दुखवटा पाळण्यात येत असून सरकारी कार्यालयांना सुटी दिलेली आहे. त्यामुळे निवडणुका घेता येणार नाहीत, असे सांगण्यात आल्याचे स्पष्ट केले व ते जाण्यासाठी बाहेर पडले. बीडिओंच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी निवडणूक रद्द करण्यात आल्याचा अहवाल तयार केला व त्यावर पंचांच्या सह्याही घेतल्या. तोपर्यंत बीडिओ देसाई पुन्हा पंचायतीत दाखल झाले व पंचायत संचालनालयाकडून निवडणूक घेता येतील असे सांगण्यात आल्याचे स्पष्ट करत निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यास सांगितले. यानंतर उपस्थित पंचांनी याला आक्षेप घेतला. निवडणूक रद्द करण्यात आलेली आहे, त्याबाबतचा अहवाल तयार होउन पंचांच्या सह्या झालेल्या आहेत. असे असताना आता निवडणुका घेण्यास कशा सांगता, असा सवाल करत निवडणुकीसाठी पुढील तारीख जारी करण्यात यावी, अशी मागणी केली. यानंतर बीडिओ आदर्श देसाई यांनी सांगितले की, दवर्ली दिकरपाल पंचायतीच्या निवडणुकीबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येणार आहे. त्यानुसार सरपंच व उपसरपंच निवडणुकीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.