मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दिले अधिकाऱ्यांना आदेश!

फातोर्डातील सहा कुटुंबाना मिळणार ‘माझे घर’ योजनेचा लाभ

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दिले अधिकाऱ्यांना आदेश!

मडगाव : फातोर्डा स्टेडियमची निर्मिती करण्यात आली त्यावेळी त्या जागेवर राहणार्‍या सहा कुटुंबांचे पुनर्वसन केले. मात्र, त्यांना जागेची मालकी अजूनही दिलेली नाही. आमदार सरदेसाई यांच्यासह सदर कुटुंबीयांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतल्यानंतर माझे घर या योजनेतून सदर कुटुंबीयांना जागेचा मालकी हक्क देण्यात येईल असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.


फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरु स्टेडियमवरील पश्चिम बाजूच्या स्टँडला माजी मंत्री फ्रान्सिस्को मोंत क्रुझ यांचे नाव देण्यात आले. या कार्यक्रमाला आले असता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आले होते. फातोर्डा येथील एसटी समाजातील सहा कुटुंबीयांना जागेच्या मालकीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित असल्याने फातोर्डा आमदार विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी कुटुंबीयांच्या सदस्यांची भेट घालून दिली.


फातोर्डा स्टेडियमची उभारणी करण्यासाठी 1989 मध्ये स्टेडियमच्या जागेवरील कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आलेले होते. पुनर्वसन करण्यात आलेले असले तरीही मागील 35 वर्षे सदर कुटुंबीयांना जागेचा मालकी हक्क मिळालेला नसल्याचे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.  स्टेडियमच्यावेळी कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले पण घराच्या जागेची मालकी देण्यात आलेली नाही.


ज्याठिकाणी या कुटुंबीयांचे घर आहे, ती जागा व सभोवतालच्या दोन मीटरच्या जागेचा मालकी हक्क देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले. तसेच क्रिडा संचालक अजय गावडे यांनाही सदर कुटुंबीयांकडून जागा देण्यात आल्याची कागदपत्रे व इतर कागदपत्रे घेत प्रक्रिया सुरु करण्यात याव्यात. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सदर कुटुंबीयांना जागेसंदर्भातील सनद देण्यात याव्यात, अशा सूचना केल्या.