म्हापसा दरोडा : पोलिसांची सर्व पथके परतली
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : गणेशपुरी-म्हापसा येथील डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर पडलेल्या सशस्त्र दरोडा प्रकरणी पोलिसांनी दोघा बांगलादेशी नागरिकांना अटक केली. या संशयितांनी सहा जणांच्या मुख्य टोळीला बांगलादेशमध्ये सुखरूप पळून जाण्यास मदत केली असून घटनेच्या दिवशी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. संतोष बाबू बी. (२७) व सफिकुल रोहूल अमीर (३७, दोघे रा. इब्बलुरू बंगळूरू) अशी त्यांची नावे असून ते मुख्य दरोडेखोरांचे नातेवाईक आहेत. पोलीस चोरांच्या मागावर असल्याची चाहुल लागल्यावर वरील संशयितांनी बंगळुरूहून टोळीला हैदराबादपर्यंत जाण्यास मदत केली होती. गुरुवार, ९ रोजी मानवी आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र तोपर्यंत मुख्य दरोडेखोर बांगलादेशात जाण्यात यशस्वी झाले होते. मंगळवारी पोलिसांनी दोघाही संशयितांना चौकशीअंती अटक केली. त्यांच्यावर भा.न्या.सं.च्या ३३१(३), ११५(२), ३५१(३), १२६(२), ३१०(२), ६१(२), १११ व ३(५) कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी टोळीला मदत करणाऱ्या आणखी तीन-चार जणांची चौकशी केली होती. त्यामुळे त्यांनाही पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता आहे.
दरोडेखोरांचा कार, बसमार्गे प्रवास
डॉ. घाणेकर यांच्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्याची माहिती पोलिसांना मिळण्यापूर्वीच दरोडेखोरांनी गोव्याची सीमा ओलांडली होती. दरोडेखोरांची ओळख आणि त्यांचा माग काढेपर्यंत ते बिजापूरमार्गे बंगळरूला पोहोचले होते. बिजापूरपर्यंत त्यांनी कारमधून प्रवास केला. तिथून त्यांनी बसमार्गे प्रवास केला. बंगळरूहून ते हैदराबादमध्ये गेले. तिथून काहीजण पश्चिम बंगालच्या दिशेने गेले. मेघालयमध्ये एकत्र येऊन त्यांनी सुरक्षा यंत्रणांना चकवा देत देशाची सीमा ओलांडली. त्यामुळे गोवा पोलिसांची सर्व पथके माघारी परतली आहेत.