राज्यात जिल्हा पंचायतींसाठी १३ डिसेंबर रोजी मतदान

आरक्षणाची प्रकिया सुरू : नोव्हेंबरमध्ये आचारसंंहितेची स्वतंत्र अधिसूचना


5 hours ago
राज्यात जिल्हा पंचायतींसाठी १३ डिसेंबर रोजी मतदान

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील जिल्हा पंचायतींच्या ५० मतदारसंंघांंसाठी १३ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. मतदारसंघ फेररचनेची प्रक्रिया पूर्ण होऊन आरक्षणाची प्रक्रिया आता सुरू होणार आहे. आचारसंहितेची स्वतंत्र अधिसूचना नोव्हेंबरच्या मध्यात जारी होणार आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकांची तारीख जाहीर होण्यापूर्वीच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली होती. आता निवडणुकांची तारीख जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग येणार आहे. उत्तर गोव्यात २५ आणि दक्षिण गोव्यात २५, असे एकूण ५० मतदारसंंघ आहेत. जिल्हा पंचायतींचा कार्यकाळ जानेवारीत पूर्ण होत आहे. त्यापूर्वी निवडणूक घेऊन नव्या जिल्हा पंचायतींची स्थापना होणे आवश्यक आहे. नाताळ आणि नव्या वर्षामुळे राज्यात २० डिसेंबरपासून उत्सवी वातावरण असते. त्यापूर्वी जिल्हा पंचायत निवडणूक होऊन निकालही जाहीर होतील.
मागच्या वेळी १२ डिसेंबर २०२० रोजी जिल्हा पंचायत निवडणुका झाल्या होत्या. करोना महामारीमुळे त्या ढकलाव्या लागल्या होत्या. करोना महामारीमुळे मार्गदर्शक तत्त्वानुसार मतदान घेण्यात आले होते. यावेळी जिल्हा पंचायतींचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. आयोगाने ऑगस्टमध्येच मतदारसंघ फेररचनेचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यांसाठी निवडणूक अधिकारी आणि साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक केली. निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक झाली. साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मामलेदार वा संयुक्त मामलेदारांची नियुक्ती झाली. निवडणूक अधिकारी आनी साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारसंंघ फेररचनेचा मसुदा तयार केला. हा मसुदा १५ सप्टेंबर रोजी सरकारने खुला केला. मसुद्याच्या प्रती मामलेदार व जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध करून जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. सूचना सादर करण्यासाठी २६ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. या मुदतीपर्यंत आलेल्या सूचना व हरकतींचा विचार करून आयोगाने मतदारसंंघ फेररचनेची प्रक्रिया पूर्ण केली. प्रत्येक मतदारसंंघात तीन वा चार पंचायती आहेत. मतदारसंंघाच्या सीमा पूर्वीप्रमाणेच आहेत. मतदारसंंघ फेरचनेचा मसुदा तयार झाल्यानंतर आता निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे.
सप्टेंबरअखेरीस राज्य निवडणूक आयुक्त दौलत हवालदार यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. राज्य निवडणूक आयुक्तांचे पद रिक्त झाल्याने काही काळ प्रक्रिया ठप्प होती. आता माजी आयएएस अधिकारी मिनिनो डिसोझा यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे मतदारसंघ आरक्षणाची प्रक्रिया गतीने होणे अपेक्षित आहे. यापूूूर्वी मतदारसंंघ फेररचना व आरक्षणाची प्रक्रिया पंचायत संचालनालय करत होते. सरकारने कायद्यात दुरुस्ती करून फेररचना व आरक्षणाचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे फेररचना व आरक्षणाची प्रक्रिया यावेळी राज्य निवडणूक आयोगाने केली. आता एससी, एसटी, ओबीसी व महिलांसाठी ठरलेल्या टक्केवारी प्रमाणे मतदारसंंघ आरक्षित करावे लागतील. याला वेळ लागण्याची शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयुक्तपदी मिनिनो डिसोझा
राज्य निवडणूक आयुक्तपदी मिनिनो डिसोझा यांची नियुक्ती झाली. त्यांच्या नियुक्तीचा आदेश पंचायत संंचालनालयाने जारी केला. राज्य निवडणूक आयुक्त हा पूर्ण वेळ असावा. नागरी सेवेचो अनुभव असावा आणि ६५ वर्षे वायाचा अधिकारी या पदासाठी पात्र ठरतो. मिनिनो डिसोझा यांनी यापूूर्वी पर्यटन संचालक, पंंचायत संंचालक या पदांची जबाबदारी सांभाळली आहे.
जिल्हा पंचायतींसाठी मतदारसंघ
द‌क्षिण गोवा : उसगाव-गांंजे, बेतकी-खांडोळा, कुर्टी, वेलिंंग-प्रियोळ, कवळे, बोरी, शिरोडा, राय, नुवे, कोलवा, वेळ्ळी, बाणावली, दवर्ली, कुडतरी, गिर्दोली, नावेली, सावर्डे, धारबांदोडा, रिवण, शेल्डे, बार्से, खोला, पैंगीण, सांकवाळ, कुठ्ठाळी.
उत्तर गोवा : हरमल, मोरजी, धारगळ, तोर्से, शिवोली, कोलवाळ, हळदोणा, शिरसई, हणजूण, कळंगुट, सुकूर, रेईश मागूस, पेन्ह द फ्रान्स, सांंताक्रूझ, ताळगाव, चिंंबल, खोर्ली, सेंट लॉरेन्स, लाटंबार्से, कारापूर-सर्वण, मये, पाळी, होंडा, केरी, नगरगाव.