पणजी : गोव्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री (Ex-Chief Minister) व कृषीमंत्री (Agriculture Minister) रवी नाईक (Ravi Naik) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार आले, मात्र २००७ साली घडलेल्या एका राजकीय घडामोडीने त्यांचे मुख्यमंत्रीपद अक्षरशः “थोडक्यात” हुकले होते.
कॉंग्रेस पक्षाला सत्तेची संधी मिळाली होती आणि रवी नाईक यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जवळपास निश्चित झाले होते. गोव्याच्या कॉंग्रेस पक्षाच्या तत्कालीन प्रभारी मार्गारेट आल्वा यांनी त्यांचे नाव दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवले होते. मात्र शेवटच्या क्षणी समीकरणे बदलली.
त्यावेळी मुख्यमंत्री असलेले प्रतापसिंग राणे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा हट्ट काहींनी धरला. राणे नाहीत तर रवी नाईकही नाही असा पवित्रा काहींनी घेतल्यामुळे ऐनवेळी बदल झाले.
या तिढ्यातून मार्ग काढण्यासाठी कॉंग्रेस नेतृत्वाने सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय शिष्टमंडळ गोव्यात पाठवले. दीर्घ चर्चेनंतर अखेर दिगंबर कामत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. रवी नाईक यांना गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. अशा रीतीने, त्यांच्या हातातून मुख्यमंत्रीपद निसटले.
या घडामोडींना आज, रवी नाईक यांच्या निधनानंतर, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, “रवी नाईक हे जनतेशी घट्ट नाळ असलेले नेते होते. त्यांनी नेहमीच कुळ-मुंडकारांचे प्रश्न लावून धरले, मगो पक्षाचे नेते असूनही जनमत कौलाच्या वेळी गोव्याच्या बाजूने ठाम भूमिका घेतली. कोकणी-मराठी भाषेच्या प्रश्नावर त्यांनी सदैव कोकणीला प्राधान्य दिले.”
रवी नाईक यांच्या निधनाने गोव्याच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण पर्व संपले आहे.