हत्ती लोकांना भेटायला आला आहे, भेटू दे त्याला ...ठरले शेवटचे विनोदी वक्तव्य

सभागृहात, जाहीर कार्यक्रमातील वक्तव्येच ठरायचे विनोद

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
हत्ती लोकांना भेटायला आला आहे,  भेटू दे त्याला ...ठरले शेवटचे विनोदी वक्तव्य

पणजी : कायम हसतमुख असणारे रवी नाईक हे दिलखुलास स्वभाव व विनोदी वक्तव्यांसाठी सर्वांना परिचित होते. सभागृहात तसेच जाहीर सभेत विरोधकांवर घणाघाती आरोप करण्यापेक्षा टिकाटिप्पणी करून लक्ष वेधणारा असा त्यांचा स्वभाव होता. यामुळे विरोधकांच्या टिकेची धार आपोआप बोथट व्हायची.

गेल्या सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातून गोव्याच्या हद्दीत आलेल्या हत्तीने पेडणे परिसरात शेती, बागायतीची नासधूस करून शेतीचे बरेच नुकसान केले होते. हत्तीचा बंदोबस्त करून शेती, बागायतीची नुकसानी कशी रोखणार? शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कधी मिळणार? असे प्रश्न पत्रकारांनी कृषीमंत्री या नात्याने त्यांना विचारले. हत्ती लोकांना भेटण्यासाठी आलेला आहे. भेटू दे त्याला. हत्ती हे गणेशाचे रूप आहे. गणेशाला आम्ही देव मानतो, असे काहीसे विनोदी शैलीत त्यांनी उत्तर दिले. विधानभवनात पत्रकारांना विनोदी शैलीत दिलेले त्यांचे हे शेवटचे उत्तर ठरले. 

त्यांची बोलण्याची पद्धत व ढंग सुद्धा काहीसा विनोदी असायचा. सभागृहात मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना खात्याचे मंत्री तासन तास बोलतात. स्व. रवी नाईक मात्र याला काहीसे अपवाद ठरतात. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात कृषी खात्याच्या मागण्यांवर बराच वेळ चर्चा झाली. आमदारांनी विविध मागण्या केल्या. तुमच्यो सगळ्यो मागण्यो हांव पुराय करता. हाका लागून मागण्यांक तुमी तेको दिवचो, एवढेच बोलून ते स्थानापन्न झाले. प्रकृती अस्वास्थामुळे गेल्या वर्षभरात अधिक बोलणेही त्यांना शक्य होत नसे.

रस्त्यांवरील खड्डे, अनियमित पाणीपुरवठा यामुळे सभागृहात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभारावर विरोधकांकडून नेहमीच टीका होते. पर्रीकर मुख्यमंत्री असताना डॉ. विल्फ्रेड डिसोझा, दयानंद नार्वेकर, जितेंद्र देशप्रभू यांच्या प्रश्नांना विनोदी शैलीत वक्तव्ये करीत ते मूळ प्रश्नालाच बगल द्यायचे. एकदा डॉ. विलीनी साळगावात कायम पाण्याची टंचाई असते, असा प्रश्न केला होता. साळगावात पाणीच नाही. यामुळे पाण्याची टंचाई असणे साहजिक आहे, असे उत्तर त्यांनी दिले. मग जलवाहिनीसाठी कायम रस्ते का फोडले जातात? असा प्रश्न डॉ. विलींनी केला होता. पाणी नसल्याने पाणी इतर ठिकाणांहून आणण्यासाठी रस्ते फोडावे लागतात, असे उत्तर त्यांनी दिले होते. त्यांच्या या उत्तराचे सत्ताधाऱ्यांनी बाक वाजवून स्वागत केले होते.