नागरी पुरवठा, हस्तकला खात्यातही मोलाचे योगदान
पणजी : गोव्याचे कृषी क्षेत्र स्वयंपूर्णतेकडे नेण्यात कृषी मंत्री रवी नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. नाईक यांच्या कारकिर्दीत कृषी खात्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. इतर कृषी मंत्र्यांच्या तुलनेत रवी नाईक यांची कारकीर्द कृषी क्षेत्रात वाखाणण्याजोगी ठरली आहे. याव्यतिरिक्त, नागरी पुरवठा आणि हस्तकला खात्यानेही त्यांच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतीच गोवा कृषी क्षेत्रात ५० टक्के स्वयंपूर्ण झाल्याची घोषणा केली होती. हा ५० टक्क्यांचा टप्पा गाठण्याचे श्रेय खऱ्या अर्थाने कृषी मंत्री रवी नाईक यांना जाते. त्यांच्या कार्यकाळात पडीक जमीन लागवडीखाली आणली गेली, नवीन शेतकरी तयार झाले आणि लागवडीचे क्षेत्र वाढले. शेतीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई दिली गेली. नाईक यांच्या कार्यकाळात भाजीपाला पहिल्यांदाच परराज्यात निर्यात झाला आणि मानकुराद आंबा प्रथमच लंडनपर्यंत पोहोचला.बराच काळ प्रलंबित असलेले महत्त्वाचे 'गोवा अमृत काळ कृषी धोरण' रवी नाईक यांच्या कार्यकाळातच अस्तित्वात आले. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि नाईक यांच्या उपस्थितीत हे धोरण प्रकाशित करण्यात आले. या धोरणाखाली 'केर', 'मोरड' आणि 'खाजन' शेतजमिनीच्या रूपांतरणावर बंदी जाहीर करण्यात आली.नाईक यांच्या कार्यकाळात ‘वन टाइम असिस्टन्स’ ही योजना कार्यान्वित झाली. याअंतर्गत राज्यातील ९७ शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी परत घेऊन पडीक जमीन लागवडीखाली आणली. यासाठी त्यांना २० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात आले. नाईक यांच्या या प्रयत्नांमुळे राज्यातील सुमारे १३० हेक्टर पडीक जागेवर भातशेती क्षेत्र फुलले. तसेच कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी १२ हजार शेतकऱ्यांना यंत्रसामग्री घेण्यासाठी १८ कोटींपर्यंत अनुदान देण्यात आले.
गोवा फलोत्पादन महामंडळाने ‘खात्रीशीर बाजार’ योजना कार्यान्वित करून राज्यात होणारे काकडी, भेंडी, हिरवी मिरची आणि कोबी या भाज्यांच्या उत्पादनात गोवा स्वयंपूर्ण झाला आहे. याव्यतिरिक्त, गोव्यातील १,१८७ शेतकऱ्यांनी ३ लाख किलोपेक्षा जास्त भाजीपाला कर्नाटक राज्यात निर्यात केला आहे.
मानकुराद आंब्याची लंडनवारी
रवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली मानकुराद आंबा प्रथमच लंडन शहरात पोहोचला. कृषी खात्याने आंब्याची निर्यात करण्यासाठी ‘ट्रायल’ सुरू करून ३०० किलो मानकुराद आंबे यूके देशात पाठवले. यामुळे गोव्याच्या मानकुराद आंब्याला लंडन शहरात चांगली मागणी वाढली.
नागरी पुरवठा आणि हस्तकला क्षेत्रातील कार्य
नागरी पुरवठा खात्याने पहिल्यांदाच ‘फोर्टिफाइड तांदूळ’ पुरवठा करण्यास सुरुवात केली, तेव्हा या तांदळाविषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता आणि विरोधकांनी विरोधही केला होता. आम्ही गरिबांना तांदळात व्हिटॅमिन मिसळून देतो, असे विनोदी वक्तव्य करत नाईक यांनी हा संभ्रम दूर केला. आता ‘फोर्टिफाइड तांदळाची’ नियमित पुरवठा होत आहे.
हस्तकला मंत्री या नात्याने रवी यांनी गोव्याच्या कुणबी कापडाचे रूपांतर फॅशन स्टेटमेंटात केले. कुणबी शॉलपर्यंत मर्यादित न राहता, कुणबी साडी, कुणबी जॅकेट, कुणबी टोपीपर्यंत उत्पादने तयार करून कुणबी हातमाग आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. याव्यतिरिक्त, हस्तकला खात्यामार्फत पीएम विश्वकर्मा योजना योग्य प्रकारे कार्यान्वित करून पारंपरिक व्यवसायाला त्यांनी बळ दिले.