एकेकाळी मुख्यमंत्री असताना गोव्यातील गुंडांचा बंदोबस्त करणारे रवी नाईक हे काही वर्षांपूर्वी जेव्हा राज्याचे गृहमंत्री होते, त्यावेळीही त्यांनी एका मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना स्वातंत्र्य दिले. त्यामुळे दादागिरी करणाऱ्यांविषयी रवी नाईक यांची भूमिका कधी बदलली नाही, हे यातून दिसते.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या सरकारमध्ये कृषी मंत्री राहिलेले रवी नाईक यांचे निधन झाल्यामुळे गोव्याच्या राजकारणात कधीच भरून न येणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. रवी नाईक यांचे स्थान फक्त राजकारणातच नव्हे तर शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात फार वरचे आहे. भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतर काही मोजकेच नेते गोव्याच्या राजकारणात चमकले, ज्यांची नावे आजही लोक घेतात, त्यापैकी एक रवी नाईक होते. भंडारी समाजाला दिशा देणारे म्हणून त्यांचा उल्लेख आजही भंडारी समाजाचे ‘गॉडफादर’ म्हणून केला जातो, परंतु रवी नाईक हे फक्त एका समाजाचे राहिले नाही, ते गोव्यातील बहुजन समाजाचे नेते ठरले. फक्त बहुजनांचेच नाही तर ज्यांच्या संपर्कात रवी नाईक आले, ते त्यांचेच होऊन राहिले. रवींच्या अंत्यदर्शनासाठी लोटलेली गर्दी त्यांची गोव्यातील राजकारण, समाजकारणात असलेली लोकप्रियता अधोरेखित करते.
१९८४ च्या निवडणुकीतून गोव्याच्या राजकारणात प्रवेश केलेले रवी नाईक हे त्यानंतर केवळ काही वर्षांतच गोव्याचे मुख्यमंत्रीही झाले. अल्पावधीत त्या पदापर्यंत पोहचलेल्या नाईक यांना त्यावेळी गोव्यात सुरू झालेल्या एकमेकांचे पाय खेचण्याच्या राजकारणाने त्यांचे मुख्यमंत्रिपद गमवावे लागले. त्यांच्या भाग्यात गोव्याचे मुख्यमंत्रिपद पुन्हा लिहिले गेले, जेव्हा तत्कालीन राज्यपाल भानू प्रकाश सिंग यांनी अचानक डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांचे सरकार बडतर्फ केले आणि रवी नाईक यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. पण दिल्लीतून पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी हस्तक्षेप करून राज्यपालांनाच बडतर्फ केल्यामुळे रवी यांचे मुख्यमंत्रिपदही गेले. निवडून आल्यानंतर सात वर्षांत मुख्यमंत्री होऊन गोव्यातील गुंडांचा कर्दनकाळ ठरलेले रवी नाईक यांच्याकडे अजून काही वर्षे राज्याची धुरा राहिली असती, तर गोव्यातील राजकीय चित्रही वेगळेच असते. त्याच दरम्यान गोव्यात पाय रोवत असलेल्या भाजपला नंतर पुढे काही वर्षांनी रवी नाईक यांनीच सत्तेत येण्यासाठी मदत केली. ते त्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले.
गोरगरीबांची चिंता करणारा, कूळ-मुंडकार यांची तळी उचलून धरणारा आणि आपल्याकडे मदत मागण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला तेवढ्याच दानशूरपणाने आवश्यक ती मदत करणारा हा नेता आपल्या खेळकर स्वभावामुळेही बराच चर्चेत राहिला. गोव्यातील अपात्रता नाट्यही त्यांच्यापासूनच सुरू झाले. न्यायालयांपर्यंत अपात्रता पोहोचण्याचे प्रकरणही रवी नाईक यांचेच. सर्वोच्च न्यायालयाने नंतर याच प्रकरणात घटनेच्या दहाव्या परिशिष्टाप्रमाणे पक्षांतर झाले, हे सिद्ध करण्यास रवी नाईक असमर्थ ठरल्याचा ठपकाही ठेवला. या खटल्याचा आदेश त्यानंतर देशातील अनेक अपात्रता प्रकरणांत वापरला गेला. म्हणजे सर्वोच्च न्यायालयात रवी नाईक यांच्याच प्रकरणात दिलेला आदेश देशात बरीच वर्षे उदाहरण म्हणून वापरला गेला. पक्षांतर करून वेगळा गट स्थापन करण्यापासून ते अपात्रता, हे रवी नाईक यांच्यापासूनच गोव्यात सुरू झाले. सर्वसामान्य कुटुंबातून आलेला हा नेता गोव्यातील राजकारणात नेहमी चर्चेत राहिला. एका लोकसभा निवडणुकीत जिंकून ते संसदेतही पोहोचले. मडकई आणि फोंडा या दोन्ही मतदारसंघांत त्यांनी विजयी होण्याची किमया केली. इतकेच नव्हे तर फोंड्यातील इतर मतदारसंघांतही रवी नाईक यांचा एकेकाळी दबदबा होता. आज भंडारी समाज विस्तारलेल्या अनेक मतदारसंघांत रवी नाईक यांचा प्रभाव आहे. फोंड्यात त्यांना लोक जी 'पात्राव' म्हणून हाक मारत असत, तीच हाक नंतर त्यांची ओळख ठरली. रवी नाईक यांना बहुसंख्य लोक 'पात्राव'च म्हणत. राजकीय नेते त्यांना त्याच नावाने हाक मारत. मनानेही श्रीमंत असलेला हा नेता खरोखरच शेवटपर्यंत सर्वांचा 'पात्राव' म्हणून राहिला. पंचवीस वर्षांपूर्वी भाजपला सत्तेत आणण्यास मदत करणारे रवी नाईक पुढे पुन्हा काँग्रेसमध्ये जाऊन गृहमंत्री झाले. पुन्हा भाजपात आले आणि २०२२ मध्ये ते सध्याच्या सरकारमध्ये कृषी मंत्री झाले. भाजपने आलेक्स सिक्वेरा यांना आरोग्याच्या कारणावरून मंत्रिपदावरून दूर केले. पण रवी नाईक यांना बदलण्याचा विचार भाजपने शेवटपर्यंत केला नाही. रवी नाईक यांची प्रकृती गेल्या काही वर्षांत खालावली होती. पण त्यांनी मंत्री म्हणून शेवटपर्यंत सक्रियपणे काम केले. त्यांचा दबदबा म्हणण्यापेक्षा भंडारी समाजावर प्रभाव असलेला नेता असल्यामुळे त्यांच्या वाटेला सहजासहजी कोणी जातही नव्हते. एकेकाळी मुख्यमंत्री असताना गोव्यातील गुंडांचा बंदोबस्त करणारे रवी नाईक हे काही वर्षांपूर्वी जेव्हा राज्याचे गृहमंत्री होते, त्यावेळीही त्यांनी एका मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना स्वातंत्र्य दिले. त्यामुळे दादागिरी करणाऱ्यांविषयी रवी नाईक यांची भूमिका कधी बदलली नाही, हे यातून दिसते. रवी नाईक जरी शरीराने गेले असले तरी बहुजन समाजाने असे चांगले नेते तयार करण्यावर भर दिला, तर रवी नाईक यांचे नाव अमर राहील.