मातीशी नाळ राखणारा शरद ऋतू

शरद ऋतूत येणाऱ्या गोव्यातील बहुतांश सण-उत्सवांचा संबंध कृषी संस्कृतीशी आहे आणि कष्टकरी समाजाने त्यात उत्स्फूर्तरित्या सहभाग घेतला होता. आज या उत्सवांचा मूळ हेतू लोप पावून प्रदूषणामुळे ते परिसरातील लोकांना वेदनादायक होऊ लागलेले आहे.

Story: विचारचक्र |
5 hours ago
मातीशी नाळ राखणारा शरद ऋतू

भारतीय कालगणनेनुसार पावसाळा ओसरू लागल्यावर शरद ऋतूचे जेव्हा आगमन गोवा, कोकणात होऊ लागते तेव्हा हवेत खरे तर आल्हाददायक गारवा निर्माण होतो आणि त्यामुळे हा ऋतू केवळ वृक्षवेली, पशुपक्षी यानाच नव्हे तर लोकमानसालादेखील हवाहवासा वाटतो. सध्या हवामान बदलामुळे एरवी हवेत असणारा गारवा लोप पावलेला आहे आणि त्यामुळे सध्या शरद ऋतू आला, याची प्रचिती सह्याद्रीच्या डोंगरकपारीत वसलेल्या काही मोजक्याच गावांत अनुभवायला मिळते. शरद ऋतूतील उत्साहपूर्ण वातावरणाचा लाभ घेत आपल्या पूर्वजांनी नानाविविध सण, उत्सव, विधी, परंपरा यांचे नियोजन केले होते. नवरात्रीच्या कालखंडात देवीच्या मंदिरात भजन, कीर्तन, पठण, वाचन आदी कार्यक्रमांच्या आयोजनामुळे जी ऊर्जा भाविकांना प्राप्त झालेली असते, त्यांच्या उत्स्फूर्त आविष्काराचे दर्शन विजयादशमीच्या तरंगोत्सवाच्या प्रसंगी होते. विजयादशमीच्या प्रसंगी जी स्त्रीरुपी देवी आणि पुरुषरुपी देव तत्वांच्या तरंगांची मेळामेळ होते, त्यातून प्रकृती आणि पुरुषतत्वाच्या मिलनाची अभिलाषा आपल्या लोकमानसाने बाळगली असावी. दसरा ते दिवाळी या उत्सवांच्या कालखंडात विशेषतः आज सह्याद्रीच्या खोऱ्यात आणि परिसरात वसलेल्या गावात मातीविषयीची कृतज्ञता प्रकट करण्यासाठी विविध प्रकारच्या विधींचे प्रयोजन इथल्या संस्कृतीने केलेले आहे.

भाद्रपदात गणपतीची मृण्मयी मूर्ती पुजण्याच्या मागे आपल्या पूर्वजांच्या अंतःकरणात माती सुफलाम् असल्याने तिच्याविषयीची कृतज्ञता, आदरभाव व्यक्त करण्याचा हेतू होता. गोव्यातील बहुतांश जंगलनिवासी जाती-जमातीत मातीविषयीची कृतज्ञता प्रकट करण्यासाठी धिल्लोचे पूजन करण्याची परंपरा आहे. सत्तरीच्या डोंगर माथ्यावर वसलेल्या सुर्लसारख्या किंवा सांगेच्या एका टोकाला असलेल्या वेर्लेसारख्या गावात घरासमोरच्या तुळशी वृंदावनासमोर मातीच्या किंवा शेणाच्या गोळ्याला गोल आकार देऊन, त्याला त्यावेळी रानात मोठ्या प्रमाणात फुलणाऱ्या रानभेंडीच्या किंवा बागेतल्या लालभडक जास्वंदीच्या फुलांद्वारे सजवण्याची परंपरा आहे. काही गावात तर कुळदेवाच्या मंदिरासमोर असलेल्या तुळशी वृंदावनासमोर वारुळाच्या मातीपासून गोळा तयार करून त्याला फुलांनी सजवले जाते आणि रात्रीच्या वेळी कुमारिका स्त्रिया या धिल्ल्यासमोर लोकगीतांचे सुरेलपणे गायन करू लागतात. गोव्यात पौष महिन्याच्या कालखंडात जेथे धालोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे, तेथे ही धिल्लोत्सवाची परंपरा पहायला मिळत नाही. दक्षिण गोव्यातील सांगे, काणकोण, केपे या तालुक्यांतील मोजक्याच गावांत स्त्रिया लोकगीतांच्या गायनाच्या पार्श्वभूमीवर नृत्य, नाट्यकलेच्या गुणांचे दर्शन धिल्लोत्सवाच्या मांडावर घडवतात. पूर्वी सुमारे २५ दिवस कुमारिका धिल्लोत सहभागी व्हायच्या. दसऱ्याच्या एकदिवस अगोदर येणाऱ्या महानवमीला धिल्लोत्सवाला प्रारंभ व्हायचा आणि त्या गाऊ लागायच्या 

झिल्तावाडा गावाकू गे चंदन कापिला

चंदन कापून गे पलंग घडविला...

अशारितीने सुरू होणाऱ्या गीतातून भावजीवन समूर्त व्हायचे. धिल्लोत्सवात धिल्लोदेव साकारण्यासाठी वारुळाच्या मातीबरोबर अन्य मातीचे मिश्रण केले जाते. मातीच्या या गोळ्याला झेंडूच्या फुलांनी नाक, कान, तोंड केले जाते आणि समोर पेटलेली समई ठेवली जाते. तेथे कुमारिका लोकगीतांचे सादरीकरण करू लागतात.

धिल्ल्याच्या समारोप करताना त्या म्हणू लागतात-

आकरी पाकरी धिल्ल्या तुजी चाकरी 

तांदूळ सादेव या धिल्ल्या एकसादेव

धिल्लोप्रमाणेच गोव्यात आदिवासी गावडा जमातीत कातयोत्सवाची परंपरा होती. वेळिप जमातीत धिल्लो तर गावडा जमातीत कातयोत्सव साजरा केला जायचा. परंतु आज धारबांदोड्यातील ओकामी आणि उदळशे येथे प्रातिनिधिक स्वरुपात हा उत्सव साजरा केला जातो. पाऊस गेल्यावर नभ हळूहळू निरभ्र होऊ लागते अणि रात्री नभांगण तारकांनी भरून जाते. या तारकांना पाहून हर्षभरित झालेल्या कष्टकरी विवाहित, विधवा आणि कुमारिका एकत्र येऊन कधी फुगडी गीत गात तर कधी तुळशी वृंदावनाच्या भोवताली फेर धरून कातयोची गीते गाऊ लागतात.

कातयो बाये कातयो गे

आकाशी उदायल्यो....

सत्तरीतल्या सुर्लात दसरा ते दिवाळी या कालखंडात तुळशी वृंदावनासमोर समई पेटत ठेवून तिथल्या बायका 'गीती'चे गायन करतात. दर वेळेला संपन्न होणाऱ्या गीतीच्या गायनाने रात्री मंतरलेल्या व्हायच्या. गीती गायनातून कधी बहीण भावाच्या प्रेमाची भावना अभिव्यक्त व्हायची.

आली वर्सान दिवाळी

भयण भावाला ओव्वाळी

भावान काय गे घातिला

घातले पेडनाचे जोड

गीती गायनातून दुबळी गाय, तिचा दुबळा तान्हा आणि वाघाची भावस्पर्शी कथा समूर्त व्हायची. आज धिल्लो, कातयो, गीती गायनाची परंपरा गावागावांतून दुर्बल होऊ लागलेली आहे. केवळ एक वार्षिक विधी म्हणून ही परंपरा पाळली जाते. शरद ऋतूच्या कालखंडात लोकगीतांचे गायन केल्यानंतर इथल्या स्रियांना वायंगणी शेतीचे काम

 करण्यासाठी जणु काही ऊर्जा प्राप्त व्हायची. आज हा लोकसंस्कृती वारसा विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहे. आश्विन पौर्णिमा ही कोजागिरीसाठी प्रसिद्ध असल्याने, धनसंपत्तीची अधिष्ठात्री देवी लक्ष्मीची कृपा लाभावी म्हणून ही रात्र भजन, कीर्तन आणि परमेश्वरी नाम स्मरणाने व्यतित केली जाते. आज कोजागिरीला काही लोक जुगाराच्या खेळात शेकडो रुपयांची उधळपट्टीही करतात.

दिवाळीच्या कालखंडात धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीपूजन, नरकचतुर्दशीला नरकासुराचे दहन, बलिप्रतिपदेदिवशी गाई-बैलाचे पूजन, धेणलोउत्सव, गोक्रीडोनोत्सव, भाऊबीज आदी उत्सवांबरोबर दिवाळीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनाचे आयोजन केले जाते. शरद ऋतूत येणाऱ्या गोव्यातील बहुतांश सण-उत्सवांचा संबंध कृषी संस्कृतीशी आहे आणि भूमीची, गाईची सेवा करणाऱ्या कष्टकरी समाजाने त्यात उत्स्फूर्तरित्या सहभाग घेतला होता. आज या उत्सवांचा मूळ हेतू लोप पावून, हवा, ध्वनी, प्रदूषणाच्या अतिरेकामुळे ते परिसरातील लोकांना वेदनादायक होऊ लागलेले आहे. फटाके, दादा बॉम्ब आणि अन्य दारूकामाची आतषबाजी करून दिवाळी साजरी करण्याऐवजी पर्यावरणस्नेही उपक्रमांचे अवलंबन करणे महत्वाचे आहे.


प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५