‘व्हिसा बंदी’चे चोख प्रत्युत्तर; तालिबानचा नवा पवित्रा

Story: विश्वरंग |
5 hours ago
‘व्हिसा बंदी’चे चोख प्रत्युत्तर; तालिबानचा नवा पवित्रा

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांमध्ये संघर्षाची नवी ठिणगी पडली आहे. सीमेपलीकडून झालेल्या हवाई हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील वातावरण कमालीचे तापले आहे. पाकिस्तानच्या लष्करी कारवाईला अफगाणिस्तानने केवळ लष्करी प्रत्युत्तर देऊनच थांबलेले नाही, तर आता एका अत्यंत कठोर राजनैतिक पावलाने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे.

अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि आयएसआय प्रमुखांसह एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाला व्हिसा देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. या घटनेने दोन्ही देशांमधील दरी अधिकच रुंदावली असून, तालिबानच्या बदललेल्या आक्रमक भूमिकेचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

गेल्या काही दिवसांत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ आणि गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख असीम मलिक यांच्यासह दोन वरिष्ठ जनरलनी अफगाणिस्तानच्या दौऱ्यासाठी व्हिसाची मागणी केली होती. मात्र, काबूलमधील तालिबान प्रशासनाने त्यांची विनंती वारंवार फेटाळून लावली. इस्लामिक अमिरातचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करून हल्ले केल्यामुळे या शिष्टमंडळाच्या दौऱ्याला परवानगी नाकारण्यात आली.

या कठोर भूमिकेमागे अलीकडेच घडलेला रक्तरंजित संघर्ष आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत हवाई हल्ले केले होते. याला प्रत्युत्तर म्हणून, इस्लामिक अमिरातच्या सैन्याने शनिवारच्या रात्री ड्युरंड रेषेवर मोठी कारवाई केली. या कारवाईत पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार झाले, ३० जखमी झाले आणि २५ लष्करी चौक्यांवर ताबा मिळवण्यात आल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे. याच लष्करी यशानंतर आत्मविश्वास वाढलेल्या तालिबानने आता राजनैतिक पातळीवरही पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.

विशेष म्हणजे, एकीकडे लष्करी आणि राजनैतिक कठोरता दाखवत असतानाच, अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी मात्र शांततेची भाषा केली आहे. आम्हाला कोणाशीही संघर्ष नको आहे. आमचे इतर पाचही शेजारी देश आमच्यासोबत आनंदी आहेत, असे सांगत त्यांनी या संघर्षासाठी पाकिस्तानलाच जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला आहे. तालिबानचा हा नवा पवित्रा पाकिस्तानसाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. या व्हिसा बंदीच्या घटनेवर पाकिस्तानने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र या प्रकरणामुळे दक्षिण आशियातील राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत, हे निश्चित.

- सचिन दळवी