सायबर सुरक्षेबद्दल व्यापक जनजागृती हवी

Story: अंतरंग - गोवा |
4 hours ago
सायबर सुरक्षेबद्दल व्यापक जनजागृती हवी

कोणतेही नवीन तंत्रज्ञान नेहमीच दुधारी तलवार असते. त्याचा वापर चांगल्यासह वाईट गोष्टींसाठी देखील केला जातो. इंटरनेटमुळे जग जवळ आले तरी सायबर गुन्हेगारी देखील वाढली आहे. सायबर गुन्हेगार दरवेळेस नवीन नवीन शक्कल लढवून लोकांची फसवणूक करत आहेत. याचा सामना करण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्यासह जागृती करणे गरजेचे आहे. सतत जागृती करत राहिले तरच लोकांना सायबर भामट्यांच्या नव्या युक्ती व त्यांच्यापासून कसे दूर राहायचे हे समजेल. मागील काही वर्षांची आकडेवारी पाहता राज्यातील सायबर गुन्हेगारीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. 

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालानुसार, राज्यात सायबर गुन्ह्यांमध्ये विशेषत: महिला आणि लहान मुले  बळी ठरण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. गोव्यात नोंदवलेल्या एकूण सायबर गुन्ह्यांपैकी तब्बल ३३ टक्के गुन्हे महिला व लहान मुलांविरोधात आहेत.

इंटरनेटचा अयोग्य पद्धतीने केला जाणारा वापर सायबर गुन्ह्यांच्या वाढीस कारणीभूत ठरत आहे. गोव्यातील सायबर गुन्ह्यांची संख्या पाहिली तर, २०२० मध्ये ४०, २०२१ मध्ये ३६, २०२२ मध्ये ९० आणि २०२३ मध्ये ८६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये गुन्ह्यांची संख्या थोडी कमी झाली असली तरी, महिला व लहान मुलांचे बळी ठरण्याचे प्रमाण १ टक्क्यांनी वाढले आहे, जे गंभीर आहे.

२०२३ मध्ये नोंद झालेल्या ८६ सायबर गुन्ह्यांपैकी २८ गुन्ह्यांमध्ये महिला आणि १० गुन्ह्यांमध्ये लहान मुले पीडित आहेत. 

राज्यातील सायबर गुन्ह्यांचा हेतू पाहिल्यास, सर्वाधिक ६० गुन्हे आर्थिक फसवणुकीच्या उद्देशाने करण्यात आले होते, तर ११ गुन्हे महिलांचे लैंगिक शोषण या गंभीर स्वरूपाचे होते. 

शांतता भंग करण्याचा हेतू असणारे ७ गुन्हे नोंदवले गेले. आर्थिक फसवणूक, लैंगिक शोषण आणि बदनामी यांसारखे गुन्हे डिजिटल जगात सुरक्षा धोक्यात आणत आहेत. या वाढत्या धोक्यावर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. महिला आणि लहान मुलांमध्ये सायबर सुरक्षेबद्दल व्यापक जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने जागृती केली तरी लोक आमिषाला बळी पडून अनोळखी मेसेज, ईमेल उघडतात आणि सायबर फसवणुकीमध्ये 

अडकतात.

प्रशासनाने विशेषता सायबर पोलिसांनी सायबर कॅम्प कसे असते, सोशल मीडियावर कोणती माहिती द्यावी याबाबत लोकांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. गोवा पोलिसांच्या सायबर विभागाला अधिक सक्षम करणे आणि गुन्ह्यांचा तपास जलद गतीने करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व मनुष्यबळ पुरवणे आवश्यक आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये दोषींवर कठोर आणि त्वरित कायदेशीर कारवाई करणे आवश्यक 

आहे.

पालकांनी व शिक्षकांनी मुलांच्या ऑनलाइन अॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवणे आणि सायबर गुन्ह्यांबद्दल काही संशयास्पद आढळल्यास त्वरित पोलिसांना (१९३० हेल्पलाइन) कळवणे महत्त्वाचे आहे.

- पिनाक कल्लोळी