म्हापसा : डिचोलीचे पोलीस निरीक्षक विजय राणे सरदेसाई यांची तडकाफडकी उत्तर गोवा पोलीस राखीव विभागात बदली करण्यात आली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या तोंडी तक्रारीनंतर पोलीस खात्याने ही कारवाई केली आहे. वाळपईचे पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्याकडे डिचोली पोलीस स्थानकाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. मंगळवारी रात्री उशीरा उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी निरीक्षक राणे सरदेसाई यांच्या बदलीबाबत बिनतारी आदेश जारी करत त्यांना तत्काळ उत्तर गोवा राखीव विभागात हजेरी लावण्याचे निर्देश दिले. दरम्यान, निरीक्षक राणे यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांकडून आलेल्या अनेक तक्रारींची गृहखात्याने गंभीर दखल घेतली व त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना खात्यातर्फे देण्यात आले होते.