राज्यात रस्ते अपघातातील ९७ टक्के मृत्यू बेदरकार वाहनचालकांमुळे

‘एनसीआरबी’चा अहवाल : दोन वर्षांत ५,८५९ रस्ते अपघातांची नोंद

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
15th October, 11:48 pm
राज्यात रस्ते अपघातातील ९७ टक्के मृत्यू बेदरकार वाहनचालकांमुळे

पणजी : राज्यात २०२२ आणि २०२३ मध्ये एकूण ५,८५९ रस्ते अपघातांची नोंद झाली होती. यामध्ये ५६६ जणांचा मृत्यू झाला होता. यातील ५४९ मृत्यू बेजबाबदार, धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे अथवा चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे किंवा अती वेगाने वाहने चालवल्यामुळे झाले होते. दोन वर्षांत मद्यपान करून अथवा अमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवणाऱ्या १२ जणांचा मृत्यू झाला होता.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) ‘भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या’ या अहवालांतून ही माहिती मिळाली आहे.

अहवालानुसार, राज्यात २०२२ मध्ये एकूण ३,०१२ रस्ते अपघात झाले होते. यामध्ये २७४ जणांचा मृत्यू झाला होता. यातील धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याने १५५ जणांचा, अती वेगाने वाहन चालवल्याने ११३ जणांचा तर मद्यपान करून वाहन चालवल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. एकूण मृत्यूंपैकी २६९ मृत्यू (९८.१७ टक्के) हे वरील तीन कारणांमुळे झाले होते. याशिवाय रस्त्यावर जनावर आडवे आल्याने १२ अपघात झाले होते. यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला होता. तर चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क केल्याने एकाचा मृत्यू झाला होता.

राज्यात २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये रस्ते अपघातांची संख्या कमी झाली असली तरी मृत्यूंची संख्या ६.५६ टक्क्यांनी वाढली. २०२३ मध्ये एकूण २,८४७ रस्ते अपघातांची नोंद झाली. यातील धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याने १२७ जणांचा, अती वेगाने वाहन चालवल्याने १५४ जणांचा तर मद्यपान करून वाहन चालवल्याने ११ जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय रस्त्यावर जनावर आडवे आल्याने ८ अपघात झाले होते. यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला होता. तर चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क केल्याने एका जणाचा मृत्यू झाला होता.

अपघातात दिवसाला तिघे जखमी

राज्यात २०२२ आणि २०२३ मध्ये रस्ते अपघातांत २,२५१ जण जखमी झाले होते. याचाच अर्थ महिन्याला सरासरी ९३ म्हणजेच दिवसाला सरासरी तिघेजण जखमी झाले होते.