चोपडे येथे भीषण अपघातात झारखंडच्या पर्यटकाचा मृत्यू

पत्नी जखमी : पार्क केलेल्या ट्रकला कारची धडक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th October, 12:37 am
चोपडे येथे भीषण अपघातात झारखंडच्या पर्यटकाचा मृत्यू

पेडणे : चोपडे येथे सुसाट वेगाने जात असलेल्या एका पर्यटकांच्या चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात झारखंड येथील वाहनचालक मिलिंद उज्ज्वल सिन्हा यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली.

चोपडेमार्गे शिवोली येथे के. ए. ०३ एन. जे. ८५६७ या चारचाकी वाहनाने सुरुवातीला चोपडे सर्कलकडील संरक्षक भिंतीला धडक दिली. त्यानंतर त्या ठिकाणी पार्क केलेल्या ट्रकला धडक दिली. या धडकेत चारचाकी वाहनाचा चक्काचूर झाला. वाहनचालक जागीच ठार होण्याची घटना घडली. त्याच्या पत्नीवर उपचार केल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला.

मांद्रे पोलीस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. वाहनचालक मिलिंद सिन्हा यांच्या वडिलांचा पोलिसांनी जबाब घेऊन मृतदेह बांबोळी येथील हॉस्पिटलमध्ये शवचिकित्सेसाठी पाठवला. पुढील तपास मांद्रे पोलीस करीत आहेत.

चोपडे या ठिकाणी पोलीस नाकाबंदी हल्ली असते. त्या नाकाबंदीला न जुमानता झारखंड येथील मिलिंद उज्ज्वल सिन्हा या चालकाने गाडी पळविली. वाहनचालकाने सुरुवातीला संरक्षक भिंतीला धडक दिली. त्यानंतर त्या ठिकाणी पार्क केलेल्या ट्रकला धडक बसली. धडकेत मिलिंद सिन्हा हा चालक ठार झाला.

हेही वाचा