दोन वर्षांनी महिलेच्या मृतदेहावर होणार अंत्यसंस्कार

घरगुती जाचाला कंटाळून केली होती आत्महत्या

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
दोन वर्षांनी महिलेच्या मृतदेहावर होणार अंत्यसंस्कार

मडगाव : घरातील वादातून समांता फर्नांडिस (३०) हिने २९ ऑगस्ट २०२३ रोजी स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली होती. मागाहून या प्रकरणी सासरच्या मंडळींवर हुंडाबळीचा गुन्हा नोंद झाला होता. सासरच्या मंडळींकडून अंत्यसंस्काराला समांताची आई अ‍ॅना मारिया डायस यांचा विरोध होता. त्यानुसार, उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांनी आता १८ रोजी अंत्यसंस्कार करण्यासाठी अ‍ॅना डायस यांना परवानगी दिलेली आहे.

सासरच्या छळाला कंटाळून समांता फर्नांडिस हिने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली होती. ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी छळ केल्याने तिने हे पाऊल उचलले, असा आरोप समांताची आई अ‍ॅना डायस हिने केला होता. त्यानंतर दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांनाही निवेदन सादर करण्यात आले होते. या घटनेच्या तीन महिन्यांनंतर समांता हिच्या मृत्यूप्रकरणी हुंड्यासाठी छळ व खुनाच्या आरोपाखाली सासू संशयित पॅट्रोसिना फर्नांडिस यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणानंतर समांता हिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले नव्हते. समांता हिचा पती नोएल ब्रागांझा यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे समांताच्या अंत्यसंस्काराबाबत निर्देश देण्याची मागणी केली होती. समांता हिची आई अ‍ॅना मारिया हिने नोएल ब्रागांझा व त्यांच्या कुटुंबाला अंत्यसंस्कार करण्यास विरोध दर्शवला व आपणास अंत्यसंस्कारासाठी परवानगी देण्याची मागणी केली. त्यानंतर नोएल यांनी आपणास आक्षेप नसल्याचे सांगत आपल्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षणासह उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी व प्रसारमाध्यमांना मनाई करावी अशी मागणी केलेली होती. दक्षिण गोवा उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांनी ना हरकत दाखला जारी करत आई अ‍ॅना डायस यांना १८ ऑक्टोबर रोजी सां जुझे दी अरीयाल येथील सेंट जोसेफ चर्च येथे दुपारी साडेतीन वाजता अंत्यसंस्काराला परवानगी दिली. त्यामुळे आत्महत्येच्या दोन वर्षांनंतर आता समांता फर्नांडिस यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

हेही वाचा