जेनिटो कार्दोझ साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता!

रामा काणकोणकर यांचा युक्तिवाद : जेनिटोच्या जामिनाला विरोध

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th October, 11:54 pm
जेनिटो कार्दोझ साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता!

पणजी : जेनिटो कार्दोझ हा गोव्यातील सर्वात मोठी गुन्हेगारी टोळी चालवत असून त्याच्या टोळीत सुमारे १०० हून अधिक सदस्य आहेत. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात मागील २० वर्षे तसेच लहान वयातच अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहे. हल्लीच उच्च न्यायालयाने त्याच्या विरोधात दिलेली शिक्षा कायम केली आहे. तो साक्षीदारांवर दबाव टाकणार तसेच तो समाजासाठी धोकादायक असल्याचा दावा करून रामा काणकोणकर यांनी जेनिटोच्या जामिनाला विरोध केल्याची माहिती समोर आली आहे.

रामा काणकोणकर याच्यावर करंझाळे येथे १८ सप्टेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणात पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सराईत गुंड जेनिटो कार्दोझ याच्यासह आठ जणांना अटक करून कारवाई केली.

न्यायालयाने सर्व संशयितांना प्रथम पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याच दरम्यान २ ऑक्टोबर रोजी रामा काणकोणकरने पोलिसांना जबाब दिला. मिंगेल आरावजो हा आपला पाठलाग करत असल्याचे, तसेच मारहाण करताना हल्लेखोरांनी आपल्याला ‘गावडा’ आणि ‘राखणदार’ म्हटल्याचे रामा यांनी आपल्या जबाबात सांगितले. याची दखल घेऊन पोलिसांनी गुन्ह्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (छळ प्रतिबंध) कायद्याअंतर्गत कलम जोडण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्याकडे देण्यात आले.

जेनिटो कार्दोझ याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. त्याला काणकोणकर यांनी विरोध केला. या संदर्भात न्यायालयाने काणकोणकर यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांनी वरील दावा केला. या प्रकरणी शुक्रवारी १७ रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

हेही वाचा