दिवाळीत ओटीटीवर मनोरंजनाचा खजिना


2 hours ago
दिवाळीत ओटीटीवर मनोरंजनाचा खजिना

दिवाळीचा सोनेरी आठवडा जवळ येतोय आणि देशभरात सगळीकडे सणाची लगबग सुरू झाली आहे. काही जण फटाक्यांच्या आवाजात सण साजरा करण्याची तयारी करत आहेत. दिवाळीचा सण ओटीटीवरील मनोरंजनाने अधिकच द्विगुणीत होणार आहे.

भागवत चॅप्टर १: राक्षस । झी ५

अर्शद वारसी पुन्हा एकदा गूढ आणि रहस्यमय भूमिकेत झळकणार आहे. ‘भागवत चॅप्टर १: राक्षस’ हा थरारक क्राइम-ड्रामा आहे ज्यात तो एका पोलीस निरीक्षकाची भूमिका साकारत आहे. जितेंद्र कुमारसोबतचा हा चित्रपट अंधश्रद्धा, गुन्हेगारी आणि सत्यशोधनाचा संगम आहे.

 

फायनल डेस्टिनेशन: ब्लडलाइन्स । जीओ हॉटस्टार
हॉलीवूडची सर्वाधिक लोकप्रिय हॉरर-थ्रिलर फ्रँचायझी ‘फायनल डेस्टिनेशन’ पुन्हा एकदा परतली आहे! या मालिकेतील सहावा चित्रपट ‘ब्लडलाइन्स’ प्रेक्षकांना मृत्यूच्या अनपेक्षित साखळीत अडकवतो. अॅक्शन आणि सस्पेन्सने भरलेला हा चित्रपट हॅलोविन मूडसाठी परफेक्ट आहे.


एलुमाले । झी ५
कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सीमावर्ती भागात घडणारी ही प्रेमकहाणी रहस्यांनी भरलेली आहे. हरीश नावाच्या कॅब ड्रायव्हरला रेवती नावाच्या श्रीमंत महिलेची ओळख होते आणि त्यानंतर घडणाऱ्या घटनांमुळे त्यांच्या आयुष्यात वळण येते. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यावर मिश्र प्रतिसाद मिळालेला हा चित्रपट आता ओटीटी वर मोठा प्रेक्षकवर्ग आकर्षित करणार आहे.

 

संतोष । लायन्सगेट प्ले
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्टँडिंग ओवेशन मिळवलेला आणि ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट झालेला ‘संतोष’ अखेर ओटीटीवर दाखल होत आहे. एका गावात राहणाऱ्या स्त्रीची ही कथा आहे जिच्या पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या नवऱ्याचा दंगलीत मृत्यू होतो आणि तिचे आयुष्य एका वेगळ्या वळणावर जाते. सामाजिक वास्तव, महिला सशक्तीकरण आणि भावनिक संघर्ष यांचे हृदयस्पर्शी चित्रण या सिनेमात पाहायला मिळते.

द डिप्लोमॅट : सीझन ३ । नेटफ्लिक्स

ब्रिटिश राजदूत एका आंतरराष्ट्रीय संकटाशी लढत असताना जगातील राजकारण, गुप्त युती आणि धोरणांचे गुंतागुंतीचे पैलूमध्ये सापडतो. पहिल्या दोन सीझनप्रमाणेच हा सीझनही सस्पेन्स, षडयंत्र आणि पॉवर पॉलिटिक्सने भरलेला आहे.

शी वॉक इन डार्कनेस । नेटफ्लिक्स

शी वॉक इन डार्कनेस हा एक प्रभावी आणि तणावपूर्ण राजकीय थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात एका तरुण एजंटची कथा दाखवली आहे जी बास्क विभाजनवादी गट इटीएमध्ये सामील होते. तिचे उद्दिष्ट आहे फ्रान्सच्या दक्षिण भागात या दहशतवादी गटाचे लपण्याचे ठिकाण शोधून काढणे. ही कहाणी खऱ्या घटनांवर आधारित आहे आणि यात राजकारण, गुन्हेगारी आणि गुप्तहेरगिरी यांचा थरारक संगम दिसतो. सुसाना अबायतुआच्या दमदार अभिनयामुळे चित्रपट अधिक प्रभावी झाला आहे.

अभियंतारा कुट्टावली । झी ५

या चित्रपटात एका सरकारी कर्मचाऱ्याची भावनिक आणि कायदेशीर झुंज दाखवण्यात आली आहे. बाहेरून परिपूर्ण वाटणारे त्याचे वैवाहिक जीवन अचानक कोसळते, जेव्हा त्याची पत्नी त्याच्यावर हुंडा मागणी आणि कौटुंबिक अत्याचाराचे खोटे आरोप लावते.

गुड न्यूज । नेटफ्लिक्स

गुड न्यूज हा रोमहर्षक थ्रिलर आहे, ज्यात सरकारी अधिकाऱ्यांचा एक गट जपानहून प्योंगयांगला जाणाऱ्या हायजॅक झालेल्या विमानाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. ही कथा सत्य घटनेवर आधारित असून, यात राजकीय डावपेच, मानवी भावना आणि संकटाच्या प्रसंगी निर्णयक्षमता या तिन्हींचं प्रभावी मिश्रण आहे.