काणकोणातून पोहचला होता केरळमध्ये
पैंगीण : काणकोणच्या गोवा कॉर्नर हॉटेलमध्ये काम करणारा आणि ४ एप्रिल २०२५ पासून बेपत्ता झालेला १८ वर्षीय अंकित कुमार अखेर तब्बल सहा महिन्यांनंतर सापडला आहे. राकेश कुमार यांनी त्याला ११ ऑक्टोबर रोजी एर्नाकुलम (केरळ) येथे आपल्या ताब्यात घेतले.
राकेश कुमार यांनी सांगितले की, अंकित हा थोडा मंद बुद्धिचा युवक आहे. त्याच्या घरात त्याची काळजी घेणारे कोणी नसल्यामुळे त्याचेच नातेवाईक असलेल्या गोवा कॉर्नर हॉटेलच्या मालकाने त्याला आपल्या आस्थापनात कामावर ठेवले होते. तो लहानसहान कामे करीत असे. मात्र, अचानक ४ एप्रिल रोजी तो बेपत्ता झाला आणि त्याचा मागमूस लागला नाही. यासंदर्भात राकेश यांनी काणकोण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकित ४ एप्रिल रोजी काणकोण रेल्वे स्थानकावर गेला आणि तिथून एका गाडीमध्ये बसून थेट तिरूअनंतपूरमपर्यंत पोहोचला. त्या ठिकाणी त्याला एक बस दिसली, ज्यात तो चढला; मात्र भाषेची अडचण आणि खिशात पैसे नसल्यामुळे बस कंडक्टरने त्याला अर्ध्या रस्त्यातच उतरवले. सलग तीन दिवस तो उपाशी अवस्थेत भटकत होता. शेवटी केरळ पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला कपडे व अन्न दिले आणि नंतर त्याची व्यवस्था एर्नाकुलम येथील खिस्तुराजा प्रार्थनागृहाच्या अनाथाश्रमात केली. यानंतर त्यांनी राकेश कुमार यांच्याशी संपर्क साधून अंकितला त्यांच्या स्वाधीन केले.
अंकित कुमारची प्रत्यक्ष भेट घेतली असता, त्याला या सर्व प्रवासाचे काहीच स्मरण नव्हते. “मी केरळला कसा पोचलो, पैसे कोठून मिळाले, आणि पुन्हा मूळ गावी कसा आलो — काही आठवत नाही,” असे तो म्हणाला. मात्र, तो ज्या ठिकाणी होता, तिथे त्याची चांगली काळजी घेतली गेली, चांगले अन्न मिळत होते, असे तो नम्रपणे सांगतो.
सध्या अंकित सुरक्षित असून त्याच्या परतीमुळे गोवा कॉर्नर हॉटेलमधील सर्व कर्मचारी आणि मालक आनंदित झाले आहेत.
आधारकार्डमुळे सापडला अंकितचा पत्ता
सुदैवाने अंकितकडे आधारकार्ड होते. त्या कार्डावरून त्याच्या मूळ पत्त्याचा शोध घेणे शक्य झाले. मात्र, मंद बुद्धी आणि भाषेची अडचण यामुळे अनाथालयातील अधिकाऱ्यांना हा शोध पूर्ण करायला तब्बल सहा महिने लागले. अखेर ९ ऑक्टोबर रोजी त्यांनी राकेश कुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर राकेश कुमार स्वतः ११ ऑक्टोबर रोजी एर्नाकुलम येथे पोहोचले आणि अंकितला सुरक्षितपणे आपल्या ताब्यात घेतले.