दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून निर्णय घेण्याचे बीडीओंना निर्देश
म्हापसा : खोर्ली तिसवाडीचे सरपंच गोरखनाथ केरकर व त्यांच्या पत्नी तथा उपसरपंच सुप्रिया केरकर यांना पंच सदस्य म्हणून अपात्र ठरविण्याचा गटविकास अधिकार्यांचा निर्णय म्हापसा फास्ट ट्रॅक न्यायालयाने रद्द केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून निर्णय देण्याचा निर्देश न्यायाधीश रिना फर्नांडिस यांनी बीडीओंना दिले आहेत.
गटविकास अधिकार्यांनी दिलेला हा वादग्रस्त निकाल रद्द करून बाजूला ठेवला जात आहे. कायद्यानुसार हे प्रकरण नवीन विचारार्थ गटविकास अधिकार्यांकडे पाठवण्यात आले आहे. बीडीओ हे दोन्ही पक्षांना पुरावे सादर करण्यासाठी आणि त्यांची सुनावणी घेण्यासाठी पुरेशी संधी देतील व त्यानंतर कायद्यानुसार प्रकरणाचा निर्णय घेतील. याशिवाय न्यायालयाने खटल्याच्या गुणवत्तेवर कोणतेही मत व्यक्त केलेले नाही आणि नव्याने निर्णय घेण्यासाठी सर्व मुद्दे खुले ठेवले आहेत, असे न्यायाधीश फर्नांडिस यांनी या निवाड्यात म्हटले आहे.
दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या या आदेशाला केरकर दाम्पत्याने न्यायालयात धाव घेत दिवाणी पुनरीक्षण अर्ज दाखल केला होता. या खटल्यात गोरखनाथ केरकर व सुप्रिया केरकर यांनी पुरसो भिकारो धुळापकर (रा. धुळापी खोर्ली), होनू शंबा धुळापकर (रा. धुळापी खोर्ली), खोर्ली पंचायत आणि तत्कालिन पंचायत सचिव दिवाकर सालेलकर यांना प्रतिवादी बनवले होते.
म्हापसा फास्ट ट्रॅक न्यायालयाने या खटल्यावर शनिवार, १८ रोजी हा निवाडा दिला. अर्जदाराच्यावतीने अॅड. डी. लवंदे तर अॅड. एल. देवा यांनी प्रतिवादी धुळापकर यांच्यावतीने न्यायालयात युक्तीवाद केला.
खोर्ली गावातील सर्व्हे क्र. ६०/२ व सर्व्हे क्र. ३०/१ मधील आपल्या मालकीच्या बांधकामांना एएचएन घर क्रमांक आणि वीज व पाणी जोडणीसाठी नाहरकत दाखला (एनओसी) मिळवल्याचा दावा धुळापकर प्रतिवादींनी करीत सरपंच व उपसरपंचाविरुद्ध गटविकास अधिकार्यांकडे तक्रार केली होती. तसेच दि. २९ डिसेंबर २०२३ च्या पंचायत मंडळाच्या याबाबतच्या ठरावाला त्यांनी आव्हान दिले होते. या दाव्यांच्या आधारे गटविकास अधिकार्यांनी वरील दोघांनाही पंच सदस्य म्हणून अपात्र ठरवणारा निवाडा दिला होता.
मात्र, वरील सर्व्हे क्रमांकाच्या बांधकामांना इएचएन घर क्रमांक व एनओसी देण्याचा पंचायतीच्या पंधरावडा बैठकीत ठराव घेतला गेला. परंतु यावेळी अर्जदार केरकर दाम्पत्य गैरहजर होते, असे सुनावणीवेळी न्यायालयाच्या निदर्शनास आले.
पदाचा गैरवापर केल्याचा ठपका
स्वतःच्या मालकीच्या बांधकामांना इएचएल घर क्रमांक आणि वीज व नळ जोडणीसाठी ना-हरकत दाखला देण्याच्या प्रक्रियेत पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेऊन तिसवाडीचे गटविकास अधिकारी अनिल धुमास्कर यांनी सरपंच व उपसरपंच केरकर दाम्पत्याला पंच सदस्य म्हणून अपात्रतेचा आदेश दिला होता.