सत्र न्यायालय : तुरुंग प्रशासनाचा अहवाल ग्राह्य धरत मागणी नामंजूर
पणजी : मेरशी येथील सत्र न्यायालयाने जमीन हडप प्रकरणातील संशयित रोहन हरमलकर याचा खासगी जेवणाची मागणी करणारा अर्ज फेटाळला आहे. संशयिताला पोटाचा कोणताही विकार नसून, कारागृहात कॅन्टीनची सोय उपलब्ध असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. याबाबतचा आदेश न्या. ईर्शाद आगा यांनी दिला.
म्हापसा पोलिसांनी २०२२ मध्ये हणजूण येथील सर्व्हे क्रमांक ४२६/५ मधील जमीन हडप केल्याप्रकरणी रोहन हरमलकर विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर, जमीन हडप प्रकरणी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) हणजूणमधीलच सर्व्हे क्रमांक ४४४/८ मधील २,४५० चौरस मीटर जमिनीप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल केला. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये मनी लाँड्रिंगचा संशय आल्याने सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या प्रकरणांची दखल घेत तपास सुरू केला.
आरोग्याच्या कारणास्तव जेवणाची मागणी
रोहन हरमलकर याने न्यायालयात अर्ज करून आपल्याला अॅसिडिटी आणि अन्नातून विषबाधा अशा आरोग्य समस्या झाल्याचा दावा केला होता. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगत, त्याने वैयक्तिक जेवण घेण्याची विशेष सवलत देण्याची मागणी केली. यावर न्यायालयाने तुरुंग अधीक्षकांची बाजू ऐकली. संशयिताला पोटाच्या विकाराची कोणतीही समस्या नाही, मध्यवर्ती कारागृहात कॅन्टीनची सुविधा आहे आणि प्रत्येक कैद्याला आठवड्यातून एकदा आवश्यक वस्तू खरेदी करण्याची परवानगी दिली जाते, असे तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले. हरमलकरला एकदा झालेला आरोग्याचा त्रास अन्नातून विषबाधा नव्हती, असेही नमूद करण्यात आले. या सर्व बाबींची दखल घेत न्यायालयाने संशयिताची मागणी फेटाळून लावली.