देव असल्याच्या भ्रमात विरोधकांनी राहू नये !

मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर : वास्तव ओळखा


4 hours ago
देव असल्याच्या भ्रमात विरोधकांनी राहू नये !

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : देव कोण आणि नरकासुर कोण, हे विरोधकांनाच विचारा. ते जर स्वतःला देव समजत असतील तर ते भ्रमात आहेत. त्यांनी भ्रमातून बाहेर पडावे आणि वास्तव ओळखावे, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
फातोर्डा मतदारसंघात गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी श्रीकृष्ण विजयोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेसचे आमदार युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा, आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब आणि आयोजक आमदार विजय सरदेसाई उपस्थित होते. गोव्याच्या हितासाठी आपण एकत्र आल्याचे या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केले. यावेळी सर्वच नेत्यांनी भाजप सरकारचा ‘नरकासुर’ असा उल्लेख केला. यावर मुख्यमंत्र्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आम्ही स्वतःला देव समजत नाही. जनतेची सेवा करत आहोत आणि पुढेही करत राहू. जनता हीच सर्वोच्च आहे.
फातोर्ड्यातील कार्यक्रमात मनोज परब म्हणाले होते की, विरोधकांची ही एकता सत्तेतील नरकासुरांचा अंत करेल. मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता आहे.