धीरयोवर कारवाई होत असल्याने आता कोंबड्यांवर पैजा
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : बेकायदा धीरयोवर पोलीस कारवाई करत असल्याने आता सासष्टी परिसरात कोंबड्यांच्या झुंजी सुरू झालेल्या आहेत. परप्रांतीय व्यक्तींसह काही स्थानिकांचा यात सहभाग असल्याचे दिसून येत असून कारवाईची मागणी होत आहे.
कोलवा गावात सुरू असलेल्या बेकायदेशीर कोंबड्यांच्या झुंजींबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यात स्थलांतरितांचा सक्रिय सहभाग आणि काही स्थानिकांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. वारंवार तक्रारी आणि अधिकाऱ्यांना सादर केलेले विश्वसनीय पुरावे असूनही अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
रविवारी कोलवा येथील ‘कलर्स फ्लाय’ हॉटेलच्या मागे कोंबड्यांच्या झुंजी झाल्या. याठिकाणी नियमितपणे झुंजी आयोजित केल्या जातात. यामुळे विशेषतः रविवारी मोठी गर्दी होते. या झुंजीमध्ये उघडपणे जुगार आणि सट्टेबाजी केली जाते. यात कायदा आणि सुव्यवस्था, प्राण्यांवरील क्रूरता आणि परिसरातील सार्वजनिक सुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता निर्माण होते. पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजकांवर आणि सहभागींवर तत्काळ कारवाई करावी, अशी रहिवाशांची मागणी आहे.
अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणूनही कारवाई नाही : रॉड्रिग्ज
स्थानिक सिमाओ रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, कोंबड्यांच्या झुंजीचा मुद्दा सातत्याने समोर येत आहे. बेकायदेशीर कोंबड्यांच्या झुंजी आयोजित करण्यामध्ये मोठ्या संख्येने स्थलांतरित सहभागी असतात. दर रविवारी कलर्स फ्लाय हॉटेलच्या मागे या झुंजी पहायला मिळतात. हा मुद्दा संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला होता; पण कारवाई झालेली नाही. या कारवायांविरुद्ध बोलल्याबद्दल आपणास धमकी देण्यात आली होती. काही स्थानिक लोक या बेकायदेशीर झुंजीला पाठिंबा देतात. या झुंजी स्थलांतरितांसाठी जुगार खेळण्याचे ठिकाण बनले आहे. लोक येथे कोंबड्यांच्या झुंजी पाहण्यासाठी येतात व कोंबड्यांवर पैजा लावतात.