भावना तोमारचा हॉटेलमध्ये झाला होता खून
पणजी : खोब्रावाडा कळंगूट येथील एका हॉटेलमध्ये खून झालेल्या भावना चौहान तोमार हिचे एटीएम कार्ड तसेच बॅग संशयित रश्मी सोळंकी हिच्याकडे सापडल्याचे पुरावे समोर आले आहेत, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने रश्मी सोळंकी हिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. याबाबतचा आदेश मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ईर्शाद आगा यांनी दिला.
कळंगूट पोलिसांनी १६ मार्च २०२५ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानुसार, भावना चौहान तोमार ८ मार्चपासून खोब्रावाडा कळंगुट येथील राज ईन या हॉटेलमध्ये राहत होत्या. १५ मार्च रोजी रात्री तिच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याचे हॉटेल कर्मचार्यांना आढळून आले. हॉटेल कर्मचार्यांनी खोली उघडून पाहिले असता तिचा मृतदेह जमिनीवर पडला होता, मृतदेहास दुर्गंधी येत होती. त्यानंतर कळंगुट पोलिसांना पाचारण करण्यात आले. मृतदेहाची शवचिकित्सा करण्यात आली असता, तिचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. पोलिसांनी हाॅटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, तिच्या खोलीमध्ये महिला व पुरुष असे दोघेजण गेले होते. जाताना त्यांच्याकडे भावना हिची बॅग असल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी संशयित राहुल महेश्वरी आणि त्याची पत्नी रश्मी सोळंकी या दोघांना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्र दाखल केल्यानंतर संशयित रश्मी सोळंकी यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, सरकारी अभियोक्ता राॅय डिसोझा यांनी युक्तिवाद मांडला. पोलिसांनी रश्मी सोळंकी हिला अटक केली, तेव्हा तिच्याकडून भावना हिची बॅग, एटीएम कार्ड, मोबाईल व इतर वस्तू जप्त करण्यात आले. तसेच संशयितांनी गोव्यात येण्यासाठी ज्या कारचा वापर केला होता तिही सोळंकीकडून जप्त करण्यात आल्याचा युक्तिवाद मांडला. तिचा या खून प्रकरणात सहभाग असल्याचे पुरावेही सादर केले. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून संशयित रश्मी सोळंकी हिचा जामीन फेटाळून लावला.