फातोर्डातील कार्यक्रमावेळी विरोधी पक्ष नेते एकाच मंचावर
फातोर्डा येथील श्रीकृष्ण विजय स्पर्धेच्या मंचावर एकत्र आलेले आमदार विजय सरदेसाई, विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, आरजीपीचे प्रमुख मनोज परब, काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : गोव्यातील जनतेच्या चांगल्या भविष्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज होती. आपापसातील मतभेद विसरून सर्व पक्षीय नेते एकत्र आलो आहोत. यापूर्वी जे झालं ते गेले, आता गोव्यासाठी ही एकजूट कायम ठेवू, असा निर्धार विरोधी पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला.
फातोर्डा येथील श्रीकृष्ण विजय उत्सव स्पर्धेवेळी आमदार विजय सरदेसाई यांच्यासह विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा, रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) अध्यक्ष मनोज परब हे नेते एकाच मंचावर दिसले. या सर्व विरोधी पक्षातील नेत्यांनी हातात हात घेत ते उंचावून विरोधकांची एकी कायम राहील, असे स्पष्ट केले.
प्रश्न गोव्याच्या अस्तित्वाचा असल्याने सर्वजण एकत्र : विजय सरदेसाई
आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले की, गोव्यातील लोकांना चांगली दिवाळी अनुभवता यावी यासाठी येथील नरकासुरांचा वध होणे गरजेचे आहे. त्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज होती. राज्यात गोमंतकीयांना मान मिळत नाही. फूल विक्रेते व इतर छोट्या विक्रेत्यांना मार्केटमध्ये जागा उरलेली नाही. गोव्यातील जमिनी व इतर व्यवसाय परप्रांतियांनी काबीज केले आहेत. हॉटेल व्यवसायासह पर्यटन क्षेत्रातील विविध व्यवसायांत परप्रांतीय मोठ्या संख्येने दिसून येतात. परप्रांतीय लोक या ठिकाणी येऊन सरपंचही झाले आहेत. त्यामुळे ही गोमंतकीयांसाठी जागे होण्याची वेळ आहे. यापूर्वी आरजीपीचे मनोज परब यांच्यासह इतरांनी आपणावर टीका केली व आपणही त्यांच्यावर टीका केली आहे. हा राजकारणाचा भाग आहे; मात्र आता प्रश्न गोव्याच्या अस्तित्वाचा असल्याने जे झाले ते गेले. गोव्याच्या भल्यासाठी सर्वजण एकत्र आलो आहोत.
पाप करणारा पक्ष सोडा : युरी आलेमाव यांचे आवाहन
गोव्याच्या भल्यासाठी आपापसातील मतभेद विसरून सर्वजण एकत्र आलो आहोत. ३४ टक्के विरुद्ध ६६ टक्के हा विजयी होण्याचा सोपा फॉर्म्युला आहे. कोणताही राजकीय पक्ष सर्व विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढवू शकत नाही. विधानसभेच्या सभागृहात विरोधी पक्ष म्हणून एकत्र येतो व आता सभागृहाबाहेरही एकजूट दाखवली आहे. मतविभागणी झाल्यास गोवा संपुष्टात येणार आहे, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. आपल्यामध्ये काही नरकासुर असून त्यांनाही आमच्यासोबत येण्याचे आवाहन करत आहोत. ज्यांना पाप करायचे आहे, त्यांच्यासाठी हा संदेश आहे. जर तुमचा पक्ष पाप करण्याचा प्रयत्न करत असेल तर पक्ष सोडा, असे आवाहन विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी केले.
राज्याच्या भल्यासाठी एकत्र राहणे गरजेचे : मनोज परब
आम्हाला कधीच वाटले नव्हते की आम्ही एकाच मंचावर एकत्र येऊ; पण गोव्याच्या युवकांचा, गोव्याच्या जमिनींचा व गोव्याच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याने ही एकजूट आहे. गोव्यातील छोट्या व्यक्तीचा प्रश्नही गंभीर झाला आहे. बेरोजगारी वाढत असून व्यवसायही परप्रांतीयांच्या हातात जात आहेत. पंचायतीवर सरपंच लमाणी झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या भल्यासाठी भाजप सरकाररूपी नरकासुराचा पराभव करायचा असेल तर सर्व गोवेकरांना एकत्र यावे लागेल, असे आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी सांगितले.
विरोधकांचे संघटन ही विजयाची नांदी : एल्टन डिकॉस्टा
काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा म्हणाले की, विरोधी पक्षांतील सर्व नेते एकाच मंचावर येणे हे ऐतिहासिक घडामोडीचे प्रतीक आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. विरोधी पक्षांचे नेते व कार्यकर्ते एकाच मंचावर असणे, ही आगामी निवडणुकांतील विजयाची नांदी आहे.