विजय मरीन शिपयार्डमधील दुर्घटना : कारखाने, बाष्पक खात्याकडून पाहणी
मडगाव : लोटली येथील विजय मरीन शिपयार्ड येथील आगीत मृत्यू झालेल्या तिघा कामगारांच्या कुटुंबीयांनी भरपाई दिल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याचे सांगितले. कारखाने व बाष्पक खात्याच्या पाहणीत कोणतीही सुरक्षा यंत्रणा आढळून न आल्याने कंपनीने सात दिवसांच्या आत ऑडिट अहवाल सादर करावा, असे त्यांनी सांगितले.
रासई- लोटली येथील विजय मरीन जहाज बांधणी प्रकल्पात बोट तयार करण्याचे काम सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी स्फोट झाला व आग लागली. यात सात कामगार जखमी झाले. त्यातील सेर अली (२१, पश्चिम बंगाल) व विनोद दिवाण (४२, छत्तीसगड) या दोघांचा जास्त भाजल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर गोमेकॉत उपचार सुरू असलेल्या संतोष कुमार (२५) याचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. सर्व कामगार अलिबाग (उत्तरप्रदेश) येथील असून सध्या वेर्णा येथे रहात होते. बंद टँकमध्ये सहा कामगार व एक कामगार टँकच्या बाहेर होता. मोहम्मद बाबूल (२५), मनीष चव्हाण (२६) आणि अभिषेक सिंग (२५ सर्व रा. अलिबाग, उत्तरप्रदेश) यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी विजय मरीन वर्कशॉपचे सुरक्षा अधिकारी राजू बोरा (मूळ रा. आसाम) याला अटक केली. तर, विजय मरीन शिपयार्डचे कामकाज बंद ठेवण्यात यावे, असे आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ, कामगार खाते व कारखाने व बाष्पक खाते यांच्याकडून शिपयार्डची तपासणी करून अहवाल सादर करण्यात येणार आहे.
आगीत होरपळून मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांनी हा अपघात कंपनीच्या हलगर्जीपणामुळे झाल्याने प्रत्येकी दहा लाखांची नुकसान भरपाई मिळावी तसेच मृतदेह मूळ गावी पाठवण्यात यावेत, अशी मागणी केली. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
अहवाल सादर न केल्यास कारवाईचा इशारा
कारखाने व बाष्पक खात्याने कंपनीला नोटीस जारी करत सात दिवसांत सुरक्षिततेबाबत कोणत्या उपाययोजना केलेल्या होत्या, याचा ऑडिट अहवाल सादर करावा. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले.