फोंड्यात कारच्या धडकेत सायकलस्वार चिमुकलीचा मृत्यू

कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंद : पोलीस तपास सुरू


3 hours ago
फोंड्यात कारच्या धडकेत सायकलस्वार चिमुकलीचा मृत्यू

घटनास्थळी पंचनामा करताना पोलीस. 

प्रतिनिधी। गोवन वार्ता

फोंडा : सर्वत्र दिवाळीची धामधूम चालू असताना, सिल्वानगर येथील अन्सारी कुटुंबावर मात्र आघात कोसळला. त्यांची एकुलती एक मुलगी अपघातात मृत्युमुखी पडली. सिल्वानगर, फोंडा येथे बालेनो कारने सायकल चालवत असलेल्या आठ वर्षीय हिमा अन्सारी या चिमुकलीला ठोकरल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.


दिवाळीच्या दिवशीच मन विषण्ण करणारी ही घटना फोंड्यातील सिल्वानगर भागात घडली. शाळेला सुट्टी असल्याने आठ वर्षीय हिमा सकाळी साडेदहाच्या दरम्यान आपल्या भावंडांसोबत सायकल खेळत होती. सकाळी ११ च्या दरम्यान चालक बालेनो कार पाठीमागे घेत होता. कार चालकाला ती चिमुकली दृष्टीस पडली नाही. पाठीमागे येणाऱ्या कारने सायकलला धडक दिली. त्याबरोबर ती चिमुकली खाली कोसळली. तिच्या डोक्याला जबर मार बसला. काही लोकांनी तिला एका खासगी कारमधून फोंडा येथील सब जिल्हा इस्पितळात नेले; मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.


माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी कारच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत. ऐन दिवाळी दिवशी घडलेल्या या दुर्घटनेने अनेकांचे डोळे पाणावले.