चार गोमंतकीय घेतात परराज्यांत रेशनचा लाभ

‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजनेमुळे शक्य


4 hours ago
चार गोमंतकीय घेतात परराज्यांत रेशनचा लाभ

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्यातील चार रेशनकार्डधारकांनी ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजनेअंतर्गत तीन राज्यांमध्ये रेशनचा लाभ घेतला आहे. सर्वाधिक लाभार्थी महाराष्ट्रात आहेत, अशी माहिती नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजनेचा उद्देश देशातील कोणत्याही नागरिकाला आपले रेशनकार्ड वापरून दुसऱ्या राज्यात रेशन मिळवण्याची सुविधा देणे हा आहे. त्यामुळे परराज्यात कामासाठी किंवा वास्तव्यासाठी गेलेले नागरिक मूळ राज्यातील रेशनकार्डद्वारे रेशन घेऊ शकतात. ही सुविधा फक्त राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत असलेल्या अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील कुटुंब धारकांनाच मिळते. गरीबीरेषेपेक्षा वरील कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
तीन लाभार्थी उत्तर गोव्याचे, एक दक्षिण गोव्याचा
परराज्यांमध्ये रेशनचा लाभ घेणाऱ्या चार गोमंतकीयांपैकी तिघे उत्तर गोव्याचे, तर एक दक्षिण गोव्याचा आहे. उत्तर गोव्यातील दोघांनी महाराष्ट्रात, तर एकाने केरळमध्ये रेशनचा लाभ घेतला. दक्षिण गोव्यातील एका लाभार्थीने गुजरातमध्ये रेशन मिळवले.
महाराष्ट्रात रेशन घेणाऱ्यांपैकी एक वडाळा जिल्ह्यात, तर दुसरा पालघर जिल्ह्यात आहे. केरळमधील लाभार्थी कोट्टायम जिल्ह्यात, तर गुजरातमधील लाभार्थी अहमदाबाद जिल्ह्यात रेशन घेत आहे, अशी माहिती खात्यातील अधिकाऱ्याने दिली.