होंडा सरपंच, पंच पसार पणजीत पोलिसांना धक्काबुक्की केल्याबद्दल कारवाई

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी/वाळपई : नरकारसुर प्रतिमांचे दहनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आयोजकांना आवाजाच्या तीव्रतेवरून बंधने घातली होती. काही अतिउत्साही तरुणांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सत्तरीतील होंडा येथे आवाजाच्या तीव्रतेवरून पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराची ३०० ते ४०० जणांच्या जमावाने पोलीस चौकीसमोरच कारची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. नियमभंग केल्याबद्दल कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना मळा-पणजी येथील तरुणांनी धक्काबुक्की केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
होंडा येथील घटनेची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेऊन पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानंतर वाळपई पोलिसांनी मंगळवारी रात्री होंडाचे सरपंच शिवदास माडकर, पंच कृष्णा गावकर यांच्यासह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल केला. प्राणघातक हल्ला करणे, गाडीची मोडतोड करणे तसेच पोलीस चौकीच्या इमारतीवर दगडफेक करणे, असे आरोप त्यांच्यावर आहेत. सरपंच माडकर आणि पंच गावकर पोलिसांना सापडले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी तिघांना, मंगळवारी पाच जणांना, अशी एकूण ८ जणांना अटक केली.
रात्री १० नंतर कर्णकर्कश आवाजात संगीत सुरूच राहिल्याने रूपेश पोके यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी येऊन आयोजकांना संगीत बंद करण्यास लावले. मात्र पोलीस गेल्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास पुन्हा संगीत सुरू झाले. पोके यांनी होंडा पोलीस चौकीत लेखी तक्रार दिली. त्यांच्या पाठोपाठ आलेल्या जमावाने पोलीस चौकीसमोर उभी पोके यांच्या कारची तोडफोड केली. या प्रकरणी पोके यांनी पोलिसांत तक्रार दिली.
मंगळवारी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, डिचोलीच्या उपअधीक्षक श्रीदेवी व इतर अधिकाऱ्यांनी होंडा पोलीस चौकीत येऊन आढावा घेतला. उपनिरीक्षक सनीक्षा नाईक तपास करत आहेत.
सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात
पोलीस चौकीसमोरच गाडीवर हल्ला करणे, पोलीस चौकीच्या इमारतीवर दगडफेक करणे याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
कार फोडणाऱ्यांची गय नाही : मुख्यमंत्री
होंडा येथे पोलीस चौकीसमोर कारची तोडफोड करणाऱ्यांना पोलीस सोडणार नाहीत. आतापर्यंत दोघा, तिघांना ताब्यात घेण्यात आले असून योग्य कलमे लावून कारवाई करण्यात येईल. असे प्रकार कदापीही सहन केले जाणार नाहीत, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे.
धक्काबुक्की; पणजीत १९ जणांविरुद्ध गुन्हा नोंद
पणजी : नेवगीनगर-मळा, पणजी येथे प्रिन्स ऑफ मळा नरकासुर प्रतिमेच्या दहनानंतर आयोजनस्थळी सुरू असलेेले कर्णकर्कश संगीत बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या जीपला घेराव घालून पोलिसांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पणजी पोलिसांनी १९ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
ही घटना सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. धर्मानंद साळगावकर, प्रीतेश नाईक, कृपेश माशेलकर, कृष्णा नाईक, ईश्वर वायंगणकर, कपील बागकर, सर्वेश शिरोडकर, मयूर आगरवाडेकर, ऑल्विन रॉड्रिग्ज, प्रथमेश वायंगणकर, प्रणव शानबाग, गौरांग भिंगे, केदार पाटील, मोहीत नाईक, विशांत शिरोडकर, धर्मानंद साळगावकर, प्रवीण सुतार, सौरभ नारूलकर व गौरेश शिरोडकर यांचा संशयितांमध्ये समावेश आहे.
प्रिन्स ऑफ मळा संघटनेने नेवगीनगर मळा येथे नरकासुर प्रतिमेचा कार्यक्रम आयोजित केला होता. सोमवारी पहाटे नरकासुर प्रतिमेचे दहन केल्यानंतरही संघटनेने कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात संगीत सुरूच ठेवले होते. या प्रकाराबद्दल रहिवाशांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी संगीत बंद करण्याची सूचना केली. संबंधितांनी संगीत बंद केले नाही. त्यामुळे पोलिसांनी ध्वनियंत्रणा जप्त करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेथे उपस्थित २५ ते ३० जणांच्या जमावाने पोलिसांना अटकाव केला. पोलिसांना घेराव घालून शिवीगाळ केली. धक्काबुक्की करून त्यांना धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी फौजफाट्यासह जाऊन ध्वनियंत्रणा जप्त केली.
पोलीस उपनिरीक्षक महेश नाईक यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयितांविरुद्ध भा.न्या.सं.च्या १८९(३), १८९(५), १९१(२), १३२, १२६(२) व १९० कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपेश शेटकर करत आहेत.