सरपंच शिवदास माडकर यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
वाळपई : होंडा येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुर दहनावेळी निर्माण झालेल्या गोंधळाच्या प्रकरणात अजूनही प्रमुख आरोपी फरार असून पोलिसांच्या तुकड्या महाराष्ट्रात रवाना झाल्या आहेत. या प्रकरणी वाळपई पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली असून काहींना जबाबासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, होंडा पंचायतीचे सरपंच शिवदास माडकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला होंडा गावात नरकासुर दहन केले जाणार होते. मात्र, ध्वनी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते रुपेश पोके यांनी वाळपई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्यांनी एकूण नऊ जणांची नावे नमूद करून कायदेशीर कारवाईची मागणी केली होती.
ही तक्रार दाखल झाल्यानंतर संतप्त झालेल्या काही नरकासुर उत्सव प्रेमींनी सुमारे २०० जणांच्या जमावासह पोके यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या तसेच पोलीस चौकीसमोर उभ्या असलेल्या पोके यांच्या कारला आग लावण्याचा प्रयत्न करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
या घटनेनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अनेकांची ओळख पटवून गुन्हे दाखल करण्यात आले.
आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून पाच जणांना न्यायालयीन कोठडी आणि तिघांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अनेकांना जबाबासाठी बोलावण्यात आले असून त्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे.
सध्या वाळपई पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे तपास सुरू आहे. संशयित आरोपींचा शोध तीव्र करण्यात आला असून पुढील काही दिवसांत आणखी अटक होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.
सरपंचासह काही आरोपी फरार
या प्रकरणातील काही प्रमुख संशयित अद्याप फरार आहेत. त्यामध्ये होंडा पंचायतीचे सरपंच शिवदास माडकर, पंच सदस्य कृष्णा गावकर आणि इतर काहींचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार हे संशयित महाराष्ट्रात पसार झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
वाळपई पोलिसांनी त्यांचा शोध सुरू ठेवला असून “लवकरच संशयित गजाआड होतील” असा दावा पोलिसांनी केला आहे.
गुन्हा केलेल्यांवर कारवाई करावी : देविया राणे
कारला आग लावण्याच्या घटनेत पोलिसांनी ज्या व्यक्तींना अटक केली, त्यापैकी काही जण घटनास्थळी उपस्थितच नव्हते, असा गंभीर आरोप करून ‘पोलिसांनी योग्य तपास करून खरोखर गुन्हा केलेल्यांवरच कारवाई करावी, अशी मागणी आमदार देविया राणे यांनी केली आहे. दिवाळीच्या दिवशी रात्री संगीत वाजवणे ही एक परंपरा आहे. मात्र, काही लोकांना यावरून वाद निर्माण करण्याची सवय लागली आहे, असा आरोप आमदार राणे यांनी केला.
देविया राणेंच्या आरोपांचे रुपेश पोकेकडून खंडन
माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून रुपेश पोके हा खंडणी वसूल करत आहे. सर्वसामान्य जनतेला त्रास देत आहे. अनेकांच्या बेकायदेशीर घरासंदर्भाच्या तक्रारी करीत आहे. यामुळे सामाजिक स्तरावर तो अनेकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचा आरोप आमदार राणे यांनी केला आहे. दरम्यान या आरोपांचे रुपेश पोके यांनी खंडन केले असून पुरावा असल्यास द्या, असे आव्हान त्यांनी आमदार राणे यांना दिले आहे.