२.३ कोटींच्या फसवणूकप्रकरणी ५६५ पानी आरोपपत्र दाखल

२०१७ मध्ये १८ गुंतवणूकदारांची झाली होती फसवणूक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd October, 11:14 pm
२.३ कोटींच्या फसवणूकप्रकरणी ५६५ पानी आरोपपत्र दाखल

पणजी : २०१७ मध्ये गोव्यातील १८ गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे आमिष दाखवून २.३ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) रॉयल ट्विंकल स्टार क्लब व सिट्रस चेक इन्स या कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश गोएंका, संचालक प्रकाश उत्तेकर, व्यंकटराम नटराजन आणि नारायण कोटनीस यांच्याविरोधात मेरशी येथील विशेष न्यायालयात ५६५ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात २२ साक्षीदारांची साक्ष नोंद करण्यात आले आहे.

या प्रकरणी आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) २०१९ मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, वरील कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि संचालकांनी म्हापसा परिसरात २०१७ मध्ये कार्यालय सुरू केले. त्यानुसार, वरील कंपनीने गोव्यातील गुंतवणूकदारांना जाददा परतावा देण्याचे आमिष दाखवले. १८ गुंतवणूकदारांनी कंपनीत सुमारे २.३ कोटी रुपये गुंतवणूक केले. याच दरम्यान कंपनीने म्हापसा येथील कार्यालय बंद करून पळ काढला. गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी ईओसीकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन ईओसीच्या अधिकाऱ्यांनी वरील कंपनीच्या संचालकांविरोधात २०१९ मध्ये गुन्हा दाखल करून चौकशी सुरु केली. याच दरम्यान वरील कंपनीने महाराष्ट्रात अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानुसार, तेथील पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली. याच दरम्यान सेबीने कारवाई करून कंपनीची मालमत्ता जप्त करून गोठवली.

पुढील सुनावणी ३१ ऑक्टोबर रोजी

ईओसीचे पोलीस निरीक्षक रमेश शिरोडकर यांनी तपास पूर्ण करून वरील कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश गोएंका, संचालक प्रकाश उत्तेकर, व्यंकटराम नटराजन आणि नारायण कोटनीस यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणी संशयितांना अटक न करता न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.