सिकेरी आग्वाद परिसरात दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांनी वाचविले ४२ जणांचे प्राण

क्रूझ बोट, दोन होड्या अडकल्या दगडात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
सिकेरी आग्वाद परिसरात दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांनी वाचविले ४२ जणांचे प्राण

म्हापसा : सिकेरी आग्वाद परिसरात गुरुवारी सायंकाळी दोन बचाव मोहिमांमध्ये दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांनी ४२ जणांचे प्राण वाचवले. यामध्ये ३८ पर्यटक असलेली एक क्रूझ बोट आणि चार जण असलेल्या दोन होड्या दगडांमध्ये अडकल्या होत्या.

गुरुवारी दुपारी भारतीय हवामान खात्याने पावसासह वादळी वाऱ्यांचा इशारा दिला होता. त्याचदरम्यान संध्याकाळी क्रूझ बोट खडकांमध्ये अडकल्याची माहिती मिळताच दृष्टी मरीनच्या १२ जीवरक्षकांनी बोट आणि जेटस्कीच्या सहाय्याने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, समुद्र प्रचंड खवळलेला असल्याने बोट किंवा जेटस्कीद्वारे थेट खडकांपर्यंत पोहोचणे धोकादायक होते. त्यामुळे दृष्टीच्या महेश चालवडी आणि लक्ष्मीकांत कोमटेकर यांनी जीव धोक्यात घालून पोहून क्रूझ बोटपर्यंत पोहोचण्याचे ठरवले. त्यांनी सेफ्टी रोप बोटपर्यंत नेली. नंतर दोरीच्या साहाय्याने एकामागून एक पर्यटकांना सुरक्षितरित्या आग्वाद किनाऱ्यावर आणण्यात आले. या मोहिमेत स्थानिक वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटर्सनीही सहभागी होऊन मदत केली.

दरम्यान, हे बचावकार्य सुरू असतानाच जवळच दोन होडींमध्ये असलेले चार जण खडकांमध्ये अडकले असल्याची माहिती मिळाली. तत्काळ दृष्टी मरीनचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि या चौघांना सुरक्षित किनाऱ्यावर 

आणले. नंतर सर्व प्रवाशांना पर्यटक पोलिसांनी बसमधून पणजीला त्यांच्या निश्चित स्थळी पाठवले.     

आग्वाद तुरुंगातील कर्मचाऱ्यांची मदत

बचाव मोहिमेत आग्वाद तुरुंगातील कर्मचारी आणि बंदर विभागातील कर्मचाऱ्यांनीही मदत केली. तसेच दृष्टीच्या आकाश फुलकर, प्रताप नाईक, महेश चालवडी, लक्ष्मीकांत कोमटेकर, रामकांत काणकोणकर, मंगेश गावस, अमित महाळे, उमेश माडेकर, गौरव गावडे, अजय सिंह, कार्तिक नाईक आणि हेमंत बसेरा यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा