१४ वरिष्ठ पोलीस अधिकारी तीन वर्षांहून जास्त काळ एकाच ठिकाणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
१४ वरिष्ठ पोलीस अधिकारी तीन वर्षांहून जास्त काळ एकाच ठिकाणी

पणजी : राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांची जास्तीत जास्त तीन वर्षांतून एकदा बदली केली जाते. असे असताना गोवा पोलीस खात्यात मात्र तब्बल १४ वरिष्ठ पोलीस अधिकारी तीन वर्षांहून जास्त काळ एकाच ठिकाणी सेवा बजावत असल्याचे समोर आले आहे.

गोवा पोलीस खात्यातील अधीक्षक आणि उपअधीक्षकांच्या बदलीचा आदेश कार्मिक खाते जारी करते. तर, पोलीस निरीक्षक आणि त्याखालील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आदेश पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार गोवा पोलीस खाते जारी करते. पोलीस खात्याने मागील अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक आणि त्याखालील कर्मचाऱ्यांची यादी काढली होती. त्यानंतर सुमारे १,३०० कर्मचारी पाच ते दहा वर्षाहून जास्त काळ एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचे समोर आले. त्यानंतर खात्याने २०२४ मध्ये तीन वेगवेगळे आदेश जारी करून पोलीस उपनिरीक्षक ते कॉन्स्टेबल या पदावरील सुमारे १,३०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली केली होती. असे असताना अनेकजण नवीन जागी रुजू झाले नसल्याचे समोर आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन रोखून ठेवण्याचा इशाराही देण्यात आला होता. बुधवारी पोलीस असे काही अधिकारी अजून नवीन जागी रूजू न झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांना मुक्त करण्यासाठी संबंधित पोलीस स्थानक किंवा विभाग प्रमुखावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. मात्र, काही अधिकारी आपल्या कार्यालयात किंवा विभागात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुक्त करण्यास तयार नसल्याचे समोर आले. असे असताना तीन वर्षांहून जास्त काळ एकाच ठिकाणी असलेल्या पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली कधी होणार याकडे कर्मचाऱ्यांची लक्ष लागून आहे.

बढती मिळाल्यानंतरही तेथेच कार्यरत

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस खात्यात १४ अधिकाऱ्यांची तीन वर्षांहून अधिक काळ बदली झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यात तीन अधीक्षक, आठ उपअधीक्षक आणि तीन पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. यातील काही अधिकाऱ्यांची बढती झाल्यानंतर ते एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. 

हेही वाचा