दोन कंपन्यांच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल

पणजी : गोव्यातील गुंतवणूकदारांना जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून ७ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) साॅईल प्राॅपर्टीज आणि इन्फ्रा इंडिया लि. कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील साॅईल प्राॅपर्टीज आणि इन्फ्रा इंडिया लि. या कंपनीने पाटो - पणजी येथे २०१४ मध्ये कार्यालय सुरू केले. त्यावेळी कंपनीने गोव्यातील गुंतवणूकदारांना जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून कायम ठेव आणि इतर प्रकारची ठेव योजना सुरू केली. त्यासाठी कंपनीने गुंतवणूकदारांकडून २०१४ ते २०१९ या कालावधीत रक्कम जमा करण्यास भाग पाडले. त्यानंतर कंपनीने परतावा देण्यास नकार देऊन कार्यालय बंद केल्याचे समोर आले. कंपनीने आपली फसवणूक केल्याचे समोर आल्यानंतर गुंतवणूकदारांनी ईओसीला संपर्क साधला. ईओसीचे अधीक्षक अर्शी अादिल आणि उपअधीक्षक फ्रान्सिस कोर्त यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजाशद शेख यांनी वरील कंपनीच्या संचालक व इतर अधिकाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४२०, १२० बी आरडब्ल्यू ३४ आणि गोवा ठेवीदार व्याज संरक्षण कायद्याचे कलम ३ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.