गोव्यातील यूपीआय व्यवहारांत चार महिन्यांत ५५० कोटींची वाढ

जूनमध्ये ४,०५३ कोटींचे, तर सप्टेंबरमध्ये ४,६०३ कोटी रुपयांचे व्यवहार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
गोव्यातील यूपीआय व्यवहारांत चार महिन्यांत ५५० कोटींची वाढ

पणजी : यूपीआय ॲपद्वारे (UPI) व्यवहार अथवा पेमेंट करणे हा पर्याय लोकप्रिय झाला आहे. विविध डिजिटल पेमेंट पर्यायांपैकी यूपीआय ॲप हे वापरण्यास सोपे, सुरक्षित आहे. मागील चार महिन्यांत गोव्यात यूपीआय ॲपद्वारे झालेल्या व्यवहारात ५५० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

जून महिन्यात राज्यात यूपीआय ॲपद्वारे ४,०५३ कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. सप्टेंबरमध्ये ते वाढून ४,६०३ कोटी रुपये झाले आहेत. केंद्रीय अर्थ खात्याने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे. यूपीआय ॲपमध्ये भीमपे, गुगल पे, पेटीएमसह विविध बँकाच्या ॲपचा समावेश आहे. राज्यात जुलै महिन्यात ४,३४७.७२ कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. ऑगस्ट महिन्यात यात १९० कोटींची वाढ होऊन हा आकडा ४,५३७.७२ कोटी रुपये पर्यंत पोहोचला. जून ते सप्टेंबर दरम्यान यूपीआयद्वारे पेमेंट करण्यात गोवा देशात २३व्या स्थानी राहिला. याआधी गोव्यात एप्रिलमध्ये ५,०४१ कोटी, तर मे महिन्यात ५,६५९ कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते.

संपूर्ण देशाचा विचार केल्यास वरील चार महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात १० लाख कोटीहून अधिक रुपयांचे व्यवहार हे यूपीआय ॲपद्वारे करण्यात आले आहेत. कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यांत यूपीआय ॲपद्वारे होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण अधिक, तर नागालँड, त्रिपुरा येथे कमी होते. संपूर्ण देशात सुमारे २.८० लाख कोटी रुपयांचे यूपीआय व्यवहार हे ग्रॉसरी दुकाने अथवा सुपर मार्केटमध्ये झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

दिवसाला १०.९३ लाख ट्रान्जॅक्शन

अर्थ खात्याच्या आकडेवारीनुसार, गोव्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या एकूण व्यवहारांसाठी ३.२८ कोटी ट्रान्जॅक्शन झाली आहेत. याचाच अर्थ दिवसाला सरासरी १०.९३ लाख यूपीआय ॲप ट्रान्जॅक्शन झाली आहेत.      

हेही वाचा